लहानपणापासूनच शब्दकोडे सोडवायला हवे : डॉ. मोहन आगाशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:01+5:302021-07-28T04:10:01+5:30
पुणे: शब्दकोडे हे म्हणजे मानसिक चाचण्यांचे एक साधन होऊ शकते. बुध्यांक आणि भावनांक मोजायचा झाल्यास शब्दकोडे चांगला पर्याय ...
पुणे: शब्दकोडे हे म्हणजे मानसिक चाचण्यांचे एक साधन होऊ शकते. बुध्यांक आणि भावनांक मोजायचा झाल्यास शब्दकोडे चांगला पर्याय होऊ शकतो. शब्दकोडी सोडवायला खरे आपण सर्वसाधारणपणे निवृत्तीनंतर सुरुवात करतो. परंतु, शब्दकोडी सोडविण्याचे प्रात्यक्षिक लहानपणापासून झाले पाहिजे. शब्दकोडे हे केवळ वेळ घालवण्याचं साधन नसून, आपल्या बुद्धीला दिलेले ते एक आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
क्षमा एरंडे लिखित ‘अभिनव शब्दकोडी डोक्याला खुराक’ या पुस्तकाचे डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी लेखिका क्षमा एरंडे, प्रसिद्ध शब्दकोडेतज्ज्ञ आणि महाकाय शब्दकोड्याचे निर्माते आणि शब्दकोडे क्षेत्रात योगदान दिलेले मिलिंद शिंत्रे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ वासुदेव परळीकर, अॅड. रोहित एरंडे, प्रसिद्ध व्हायोलिनवादक नीलिमा राडकर, योगेश रिडबुडकर, सतीश पुरंदरे, मंजिरी कर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
मिलिंद शिंत्रे म्हणाले, ही शब्दकोडे प्रभावी आणि दर्जेदार आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दकोडे सोडविणाऱ्यांना मोठा खजिना उपलब्ध झाला आहे. शब्दकोडी सोडविणे हे सकारात्मक व्यसन आहे. लहानांपासून थोरांपर्यंत शब्दकोडे सोडविण्याचा प्रत्येकाने सराव ठेवला पाहिजे. यामुळे मेंदू क्रियाशील राहतो.
क्षमा एरंडे आणि वासुदेव परळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. एरंडे यांनी प्रास्ताविक केले, तर अनघा परळीकर यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. रोहित एरंडे यांनी आभार मानले.
----------------------------------