ई-चलनचा दंड भरण्यासाठी न्यायालयात गर्दी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:36+5:302021-09-25T04:11:36+5:30
पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आकारलेले ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात शुक्रवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. दंडाचे प्रकरण ...
पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आकारलेले ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात शुक्रवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. दंडाचे प्रकरण निकाली लावण्यासाठी न्यायालयात पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून न देण्यात आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.
वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दोन लाखांहून अधिक दावे उद्या (दि.२५) आयोजित लोकअदालतीत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘सामा’ या खासगी कंपनीच्या माध्यमातून दंड झालेल्या वाहनचालकांना मेसेजद्वारे नोटीस पाठविण्यात येत आहे. शहरातील शेकडो नागरिकांना अशा प्रकारे मेसेजद्वारे नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. दंड न भरल्यास पुढील कारवाई टाळण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांनी न्यायालयात दाखल होत दंड भरण्यास सुरुवात केली आहे.
ऑनलाइन दंड भरण्यासाठी www.mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
--------------------------------------------------------------------
दंड भरण्याच्या रांगेत मी सुमारे दोन तास उभा होतो. पुरेसे कर्मचारी नसल्याने ताटकळत थांबावे लागले. अनेक ज्येष्ठ नागरिकदेखील दंड भरण्यासाठी आले आहेत. तेथे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी याठिकाणी स्वतंत्र रांग असायला हवी. दंडाच्या पावत्या पाठविल्यानंतर गर्दी होणार, हे लक्षात घेत पोलीस प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती सर्व खबरदारी घेणे गरजेचे होते- सुधाकर माने, नागरिक.
-----------------------------------------------------------------
मी गाडी विकूनही तीन वर्षे झाली आहेत; मात्र जी गाडी विकली त्याच क्रमांकावर मला नोटीस पाठविण्यात आली आहे. आता याबाबत कुणाकडे दाद मागायची?- श्रीकिशन काळे
----------------------------------------------------------------------------------------------------