आळंदीत '' माऊलीं '' चे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 09:16 PM2019-04-13T21:16:06+5:302019-04-13T21:17:55+5:30
मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो
आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्री'चे शिंदेशाही अवतार वैभवी रूप रामनवमी निमित्त परिश्रम पूर्वक साकारण्यात आले. श्रीचे चंदनउटीतील लक्षवेधी वैभवी रूप पाहण्यासह श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांनी आळंदी मंदिरात गर्दी केली.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो.त्यास गुढी पाडव्या पासून उत्साहात सुरुवात झाली. रामनवमी निमात्त आळंदीत स्वामी महाराज मठात देखील उटी लावण्यात आली. श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रीचे समाधीवर शिंदेशाही अवतार रुप साकारले.वैभवी रूप चंदन उटीतून साकारण्यात आले. यासाठी माऊली मंदीरात शिल्पकार अभिजित धोंडफळे,मोरेश्वर जोशी,डॉ.केदार संत,उमा धोंडफळे,दीप्ती धोंडफळे यांनी तसेच स्वामीमहाराज मंदीरात पुजारी सुधीर गांधी परीवाराने परिश्रम घेतले.
आळंदी मंदिरात या निमित्त श्रीना पवमान अभिषेक पूजा विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते झाली.यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक,श्रीचे चोपदार बाळासाहेब रणदिवे,राजाभाऊ रंधवे,पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आदी उपस्थित होते. प्रवचन सेवा झाली.वारकरी शिक्षण तर्फे कीर्तन मोठ्या उत्साहात झाली.दरम्यान मंदिरात घंटानाद,काकडा,भाविकांच्या महापूजा,महिमहिम्न पूजा,श्रींना दुधारती,धुपारती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले.