चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:34 AM2018-01-06T02:34:37+5:302018-01-06T02:34:57+5:30
नववर्षातील पहिल्याच आठवड्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
लोणी काळभोर - नववर्षातील पहिल्याच आठवड्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी महेश आगलावे यांनी विधिवत महापूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. थंडीमुळे भाविकांची गर्दी पहाटे कमी होती. सकाळी ९ वाजल्यानंतर त्यात वाढ झाली. ती रात्री आरतीपर्यंत कायम होती. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी सात वाजता विश्वस्त आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली.
भाविकांना देवस्थानच्या वतीने ८० किग्रॅची उपवासाची खिचडी व थेऊरगावातील तरुणांच्या चिंतामणी तरुण मंडळाच्या वतीने ३०० किलो साबुदाणा चिवड्याचे वाटप केले. संपूर्ण मंदिर आवार व गाभाºयात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. आगलावेबंधूंच्या वतीने दर्शनबारीवर मंडप आणि पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
आळंदी देवाची येथील स्वकामसेवा या सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांनी येथील परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. दिवसभर हवेत गारवा असल्यामुळे भाविकांना उन्हाचा त्रास जाणवला नाही. तीन दिवसांपूर्वी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात असलेले तणावपूर्ण वातावरण, तसेच पुढील महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा असूनही भाविकांची गर्दी झाली होती. त्यांना दर्शन घेणे सोईचे व्हावे, यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. याचबरोबर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी होमगार्डसहित कर्मचाºयांची चोख बंदोबस्त व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही व पोलीस हवालदार मारुती पासलकर यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने पुणे - सोलापूर महामार्ग ते थेऊरदरम्यानच्या रस्त्यावरील वाहतुकीच्या नियोजनांत त्रुटी न ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला.
१ जानेवारीपासून पीएमपीच्या वतीने हडपसर थेऊरमार्गे वाघोली अशी बससेवा सुरू केली. ही सेवा सुरू व्हावी, यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासमवेत थेऊर, कोलवडी, केसनंद ग्रामपंचायतींने विशेष प्रयत्न केले होते. त्याला महाव्यवस्थापक तुकाराम मुंढे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या मार्गावर बससेवा सुरू झाल्याने नगर महामार्गावरून दर्शनासाठी येणाºया भाविकांची सोय झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
ओझरला विघ्नहराच्या दर्शनासाठी रांगा
ओझर : संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे ५.०० वाजता देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त देविदास कवडे, शंकर कवडे, प्रकाश मांडे, बबन मांडे, साहेबराव मांडे, अनिल मांडे व ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.३० वाजता आणि दुपारी १२.०० वाजता माध्यान्ह आरती करण्यात आली.
सकाळी ८.०० वाजता नियमित पोथीवाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता ‘श्रीं’स नैवेद्य दाखवून भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात करण्यात आले. येणाºया भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, पिण्याचे पाणी, खिचडीवाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहरबाग, वाहनतळ कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन आदी व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी ७.०० वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत साईनाथमहाराज गुंजाळ तेजेवाडी यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रासादिक भजन मंडळ शिरोली खुर्द यांनी दिली. सर्व वारकºयांना अन्नदान तुळशीराम बाबूराव मांडे यांनी केले. पहाटे ५ ते रात्रौ ११ पर्यंत एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. रात्रौ १०.३० वाजता शेजारती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.
महाप्रसादाचे देणगीदार शांतारामशेठ पिसाळ (भोसरी), जयंत म्हैसकर (अंधेरी मुंबई), अनिल कुमार गांधी, (चेंबूर मुंबई), प्रवीण अनंतराव चौघुले (आळेफाटा), शंभूकुमार कासलीवाल (मुंबई), डॉ. रमेश सातारकर (औरंगाबाद) यांनी प्रत्येकी एकवीस हजार रुपये अन्नदानासाठी दिले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, अध्यक्ष व कर्मचारीवर्ग व ओतूर पोलीस ठाणे यांनी केले
सिद्धटेकला भाविकांची गर्दी
देऊळगावराजे : श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे देवाला अभिषेक करून महाआरती करण्यात आली. गणपतीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर पहाटे ५ वाजता दर्शनासाठी उघडण्यात आले. गणपतीला दुपारी १२ वाजता नैवेद्य दाखविण्यात आला भाविकांना दर्शन लवकर मिळावे, यासाठी पिंपरी-चिंचवड संस्थानाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती.