अलंकापुरीत भाविकांची ‘श्रीं’च्या दर्शनास गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 01:01 AM2019-02-03T01:01:31+5:302019-02-03T01:01:53+5:30
आळंदी येथील माऊली मंदिरात षट्तिला एकादशीदिनी राज्यातील लाखावर भाविकांनी गर्दी करून ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
आळंदी - येथील माऊली मंदिरात षट्तिला एकादशीदिनी राज्यातील लाखावर भाविकांनी गर्दी करून ‘श्रीं’चे दर्शन घेतले. इंद्रायणी नदीवरील भक्तीसोपान पुलावर दर्शनबारी गेल्याने भाविकांची निवारा व इतर पुरेशा सुविधांअभावी गैरसोय झाल्याने येथील दर्शनबारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात नव्याने विकसित केलेली दर्शनबारी भाविकांच्या गर्दीने भरल्याने दर्शनबारीची रांग पुढे इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावर आली. मंदिराच्या दर्शनबारीलगत भाविकांची दर्शनास गर्दी झाली. मात्र त्या भागातील अरुंद रस्ते, तसेच मंदिर परिक्रमा मार्गाचा प्रशस्त नसल्याने रहदारीला गैरसोयीचे ठरले. यामुळे येथील प्रभावी दर्शनबारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊन, वारा, थंडीचा गारठा सहन करीत भाविकांना श्रींच्या दर्शनबारीतून दर्शनास यावे लागले. यामुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
षट्तिला एकादशीदिनी आळंदी मंदिर परिसरासह इंद्रायणी नदीघाटाच्या दुतर्फा, प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणेस भाविकांनी गर्दी केली. परंपरेने मंदिरातील धार्मिक उपक्रम विधी, देवदर्शनास श्रींचा गाभारा खुला ठेवण्यात आला होता. मंदिरात एकादशीदिनी लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी मंदिरातील सेवक, सुरक्षारक्षक, बंदोबस्तावरील पोलीस यांनी काम पाहिले.