खंडोबादेवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी देलवडीला भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 12:50 AM2018-12-16T00:50:06+5:302018-12-16T00:50:51+5:30
५0 हजारपेक्षा अधिक भाविक : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
केडगाव : देलवडी (ता. दौंड) येथे चंपाषष्ठीनिमित्त प्रतिजेजुरी ग्रामदैवत खंडोबादेवाच्या यात्रेनिमित्त ५० हजार भाविकांनी खंडोबादेवाचे दर्शन घेतले. महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र व पर्यटन दर्जा मिळाल्याने प्रतिवर्षीपेक्षा यंदा भाविकांचा गर्दीचा ओघ वाढला होता. यात्रेनिमित्त गुरुवारी पहाटे खंडोबादेवाचा अभिषेक झाला. त्यानंतर गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील भाविकाने गावातील मुख्य चौक ते खंडोबा मंदिरापर्यंत दंडवत घातला. त्यानंतर एकेरीवाडी ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मानाचा पोषाख खंडोबादेवाला परिधान केला. दुपारी ३ च्या सुमारास देलवडी ग्रामस्थांनी देवाला पोषाख अर्पण केला. या वेळी वाघ्या-मुरळींनी खंडोबाची गाणी गाऊन कला सादर केली. निर्वी येथील सनईच्या ताफ्याने सर्वांचे मनोरंजन केले. भाविकांनी दिवसभर भंडारा व खोबरे उधळत नवस फेडले. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आल्याने दिवसभर दर्शनासाठी रांग लागली होती.
रात्री देवाचा छबिना निघाला. या वेळी वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील झांज व ढोल पथकाने कला सादर केली. त्यानंतर खर्डा (जामखेड) येथील कामगारांनी दाखविलेल्या शोभेच्या दारूने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रात्री आनंदकुमार भिसे लोकनाट्य तमाशा झाला. यात्रेनिमित्त १ लाख रुपये किमतीची विविध रंगबेरंगी फुले विकत घेऊन मंदिर सर्व बाजूंनी सजविण्यात आले होते. तसेच, मंदिर व गावातील मुख्य पेठेला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी हजेरीचा कार्यक्रम झाला. रात्री मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशाने यात्रेची सांगता झाली.
जयमल्हार आखाडा मैदानावर चितपट १५० कुस्त्यांचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. या कुस्त्यांसाठी ग्रामस्थ व यात्रा कमिटीने २ लाख रुपये ईनाम दिला. या आखाड्याला राष्ट्रीय पंच रवी बोत्रे, मनीषा दिवेकर यांनी भेट दिली. पंच म्हणून विश्वनाथ झांजे व बंडू शेलार यांनी काम पाहिले. भीमा-पाटसचे संचालक विकास शेलार यांनी समालोचन केले. प्रतिवर्षीपेक्षा यंदा जास्त मल्ल आल्याने नियोजन कोलमडले. त्यामुळे पुढील वर्षी वजनगटावर कुस्त्या घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. शेवटी वेळेअभावी काही मल्लांना कुस्ती न खेळता ईनाम देण्यात आला. एकेरीवाडी येथे पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा झाला.
वर्षभरातील तेलवातीसाठी २०० लिटर गोडेतेल जमा
यात्रेनिमित्त संपूर्ण देलवडी गावामध्ये तेलहंडा निघाला. या प्रसंगी भाविकांनी आपापल्या श्रद्धेने रंगबेरंगी फुलांनी सजविण्यात आलेल्या पितळी हंड्यामध्ये गोडेतेल ओतले. यामधून तब्बल २०० लिटर गोडेतेल जमा झाले. वर्षभर या तेलाचा उपयोग सकाळी व संध्याकाळी तेलवातीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.