सवलतीच्या वाहनांसाठी गर्दी
By admin | Published: March 31, 2017 03:23 AM2017-03-31T03:23:57+5:302017-03-31T03:23:57+5:30
सर्वोच्च न्यायालयाने वायुप्रदूषण मानांकनाची पूर्तता न करणाऱ्या बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीवर एक एप्रिलपासून
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने वायुप्रदूषण मानांकनाची पूर्तता न करणाऱ्या बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीवर एक एप्रिलपासून बंदी घातली आहे. देशभरातील विविध शोरूम आणि कंपन्यांच्या गोदामांत अशी तब्बल ८ लाख दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने असून, त्यांची किंमत या निर्णयामुळे शून्य होणार आहे. विक्रीसाठी शुक्रवारचा (दि. ३१) एकच दिवस असल्याने अनेक कंपन्यांनी दुचाकींवर १० ते २० आणि चार चाकी वाहनांवर जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत सवलत देऊ केली असल्याने शहरातील विविध शोरूममध्ये सवलत जाहीर केलेल्या वाहनांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.
सर्वोच्च न्यायालयात याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने वायुप्रदूषणाचे निकष पूर्ण न करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून बीएस-४ या मानकांची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या वाहनांची नोंदणी परिवहन विभागाच्या कार्यालयाने करू नये, असे अदेशात म्हटले आहे. बीएस-३ वाहनांची विक्री जर ३१ मार्चपूर्वी करण्यात आली असेल, तर वाहनविक्रीचा पुरावा सादर करावा लागेल. त्यानंतरच वाहनांची नोंदणी करता येईल.
वाहनविक्रीचा पुरावा म्हणून अर्ज-२१, बिल आणि वाहन विमा प्रमाणपत्र, तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे परिपत्रक राज्याचे अपर परिवहन आयुक्त एस. बी. सहस्रबुद्धे यांनी काढले आहेत.
या निर्णयामुळे विविध वाहन कंपन्यांनी जाहीर केलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी शहरातील विविध वाहनांच्या शोरूममध्ये नागरिकांकडून विचारणा होत होती. त्यामुळे शुक्रवारी वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(प्रतिनिधी)
अनेकांची संधी हुकली
गुढी पाडव्यासाठी २५ ते २८ मार्च या कालावधीत ३ हजार २३३ दुचाकी, तर १ हजार ३६ मोटार कारची खरेदी केली. तसेच दोन रुग्णवाहिका, ५ बस, २५ मालवाहतूक ट्रक, ६९ मोटार कॅब, ८ तीन चाकी मालवाहू गाड्या आणि १३ रिक्षांचा समावेश आहे. त्यातील ६०५ वाहनचालकांनी प्रत्यक्ष पाडव्याच्या दिवशी वाहनखरेदी केली. अशा तब्बल ४ हजार ३९१ वाहनांची विक्री या काळात झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली आहे. या खरेदीदारांची अनाहुतपणे मिळालेल्या सवलतीची संधी हुकली आहे.
सध्या युरो-४ निकष पूर्ण करणारी ८० टक्के वाहने आहेत. उर्वरित वाहने युरो-३ ची आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रदूषण मानके पूर्ण न करणाऱ्या देशातील ८ लाख वाहनांची १ एप्रिलपासून विक्री करता येणार नाही.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी