Pune | ईद, अक्षय्य तृतीयेनिमित्त खरेदीसाठी गर्दी, शिवाजी मार्केट हाऊसफुल
By अजित घस्ते | Published: April 21, 2023 06:47 PM2023-04-21T18:47:52+5:302023-04-21T18:48:33+5:30
ईदसाठी शिरखुर्मा तयार करण्यासाठी साहित्य, सुकामेव्याला मोठी मागणी होती, तर हिंदू बांधवांनी आंबा खरेदीसाठी सकाळपासून मार्केटमध्ये गर्दी केली होती....
पुणे : रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारपठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. शुक्रवारी शिवाजी मार्केट, मंडई, मार्केटयार्ड बाजारपेठ हाऊसफुल झाली होती. सणांमुळे बाजारपेठा फुलल्या असून, खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भर दुपारी रखरखत्या उन्हात मुस्लीम बांधव व हिंदू बांधव खरेदीसाठी घराबाहेर पडले. ईदसाठी शिरखुर्मा तयार करण्यासाठी साहित्य, सुकामेव्याला मोठी मागणी होती, तर हिंदू बांधवांनी आंबा खरेदीसाठी सकाळपासून मार्केटमध्ये गर्दी केली होती.
शेवया, सुकामेवा, कापड दुकानांसह, बांगड्या, चप्पल, मेहंदी कोन, फळे, भेटवस्तू, घर सुशोभित करण्याचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची झुंबड होती. ईदसाठी लागणाऱ्या रंगीत शेवया सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये बनारस, मालेगाव, गणेश अशा अनेक प्रकारच्या शेवया आहेत. ‘किमामी’ शेवई ही हलवा बनवण्यासाठी वापरली जाते. २४० रुपये किलोप्रमाणे या शेवया विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत, तसेच खजूर, काजू, बदाम, मनुका, मगज बीज, इलायची, अंजीर याबरोबर फालुदा, रुअब्जा अरबत, कस्टर्ड दुकाने सजली आहेत.
गेली दोन वर्षे झाली अक्षय तृतीया व रमजान ईद हा सण एकाच दिवशी येत असल्याने आम्ही हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येऊन हिंदू-मुस्लीम ऐक्य म्हणून हा दिवस साजरा करीत आहे. हिंदू बांधवांसाठी आमरस-पुरीचा बेत करत असतो, तर काही लोकांना बिर्याणी, शिरखुर्मा असे वाटप केले जाते. यावर्षी अनेक हिंदू बांधवांना आमंत्रित केले आहे.
- जावेद शेख