पुण्यातील पूर्व भागात फुकट धान्यामुळे रेशनिंग दुकानांसमोर गर्दी ; शिस्तीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 07:08 PM2020-04-15T19:08:32+5:302020-04-15T19:09:12+5:30
दुकाने खुली ठेवण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी
पुणे : पुणे शहरातील आधीचे २२ व आता २८ असे शहराच्या पुर्व भागातील ५० पेक्षा जास्त भाग कोरोना लॉकडाऊन करण्यात आले आहेत. मात्र फुकट धान्य मिळते आहे म्हणून ते घेण्यासाठी गर्दी करून नागरिकांनी या लॉकडाऊनचा फज्जा उडवला असल्याचे दिसते आहे.
पुण्याच्या मध्यभागातील सोमवार ते शनिवार या पेठा तसेच मोमीनपुरा, लोहियानगर, अन्य झोपडपट्या, येरवडा, वानवडी, कोंढवा अशी उपनगरे या भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळेच हा सर्व परिसर सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, मात्र त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेशनिंग दुकानांमधून विनामूल्य धान्यवाटप करण्याचे ठरवले. तेच धान्य मिळवण्यासाठी म्हणून पूर्व भागातील रेशनिंग दुकानात दररोज गर्दी उसळत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवणे आता रेशनिंग दुकानदारांनाही अशक्य झाले आहे.
सील केलेल्या या सर्व भागात बहुसंख्य कष्टकरी वर्गाचे प्राबल्य आहे. रोज कमवायचे, त्यातूनच सामान आणायचे व करून खायचे अशी त्यांची स्थिती आहे. रोजच्या रोज तेल मीठ मीरची आणणारी असंख्य कुटुंब या परिसरात आहेत. लॉक डाऊनमुळे रोजगार बंद झाला व त्यांचे हाल व्हायला सुरूवात झाली. त्यात रेशनवर धान्य फुकट मिळते आहे याची माहिती मिळाल्यावर ते पदरात पाडून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीतून कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग असे काहीही नियम या गर्दीकडून पाळले जाताना दिसत नाही.
रेशनिंग तसेच किरकोळ विक्रीची दुकाने खुली असण्याचा कालावथी सकाळी १० ते १२ असा दोनच तासांचा आहे. तो वाढवून सकाळी ८ ते १२ असा करावा असे काही दुकानदारांचे म्हणणे आहे. तसे केल्यास धान्य किंवा अन्य वाणसामान मिळणारच आहे याची खात्री पटून गर्दी कमी होण्यास मदत होईल असे त्यांचे मत आहे.
रेशनिंगचे धान्य नाही पण किरकोळ विक्रीचे किराणा माल दूकान आहे अशा व्यावसायिकांचीही त्यांना मालाचा नियमीत पुरवठा होत नसल्याने अडचण झाली आहे. किरकोळ तेल मीठ धान्य विकत घेणार्यांची त्यांच्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. दुकानातून माल मिळत नसल्याने हे गरीब ग्राहक हवालदील झाले आहेत.
--------
मागील काही वर्षात अनेक दुकानदारांनी रेशनिंग ची जबाबदारी घेणे त्यात फारसा नफा नसल्याने बंदच करून टाकले आहे. त्यामुळे या भागातील रेशनिंग दुकानांची संख्या कमी झाली. एकाच दुकानदाराकडे अनेक कार्ड असे झाले आहे. त्यामुळेही या दुकानांसमोर गर्दी होत आहे. दुकानांचा वेळ वाढवला तर गर्दी कमी होऊ शकते. रेशनिंग नसलेल्या दुकानांनाही मालाचा पुरवठा कमी होत आहे. तोही व्यवस्थित करण्याची गरज आहे.
अमोल ऊणेचा, किराणा माल दुकानदार
---------
लॉकडाऊनचा कालावधी अनिश्चित असल्याने मिळत असलेल्या गोष्टींचा साठा करून ठेवण्याकडे.नागरिकांचा कल वाढला आहे. हडपसर, वानवडी या भागात अनेक वसाहती आहेत. तिथे प्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सर्वच नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.
चेतन तुपे,आमदार. हडपसर विधानसभा