"दारुसाठी काय पण"म्हणत वाईन शॉप समोर तोबा गर्दी; तळीरामांना जागेवर आणण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 05:42 PM2020-05-04T17:42:36+5:302020-05-04T17:55:33+5:30

कोरोना असला म्हणून काय झाले दारुसाठी वाटेल ते...

Crowd on front wine shop of pune city from Every thing for liquar | "दारुसाठी काय पण"म्हणत वाईन शॉप समोर तोबा गर्दी; तळीरामांना जागेवर आणण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

"दारुसाठी काय पण"म्हणत वाईन शॉप समोर तोबा गर्दी; तळीरामांना जागेवर आणण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांनी रात्रीपासूनच दारुच्या दुकानासमोर नंबर लावण्यास केली सुरुवात दुकानाच्या बाहेर गर्दी केल्याने त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माणकोरोना संक्रमणशील भागात जीवनावश्यक वस्तुखेरीज इतर सर्व दुकाने बंद

पुणे :  एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासन यांची धडपड सुरु आहे. दुसरीकडे दीड महिन्यापासून घरात बसलेल्या तळीरामांना काही करुन आपला थरथराट कमी करण्यासाठी दारु हवी आहे. अशावेळी प्रशासनाने दारुची दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले आणि तळीरामांच्या आनंदाला उधाण आले. अनेकांनी तर रात्रीपासूनच आपआपल्या भागातील दारुच्या दुकानाबाहेर मुक्काम ठोकला. सोमवारी शहरातील दारुच्या दुकानाबाहेर लागलेल्या लांबच्या लांब रांगामुळे कोरोना नव्हे तर ''दारुसाठी वाटेल ते '' करण्याची तयारी अनेकांनी दाखवली. या सगळयात मात्र ''फिजिकल डिस्टन्स''चा फज्जा उडाल्याने पोलिसांना तळीरामांना जागेवर आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. 
 गेल्या काही दिवसांपासून दारुची दुकाने सुरु करावीत अशी मागणी विविध स्तरांतून होत असताना त्याला जोरदार पाठींबा तळीरामांकडून मिळत आहे. अशातच रविवारी दारुची दुकाने सोमवारपासून खुली होतील. याला अपवाद फक्त कोरोना संक्रमणशील भागाचा असेल असे पालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले होते. त्यात दुकानांची वेळ निश्चित करण्यात आली होती. सोशल मीडियावरुन दारुची दुकाने सुरु होणार अशा प्रकारचा मेसेज व्हायरल झाल्याने अनेकांनी रात्रीपासूनच दारुच्या दुकानासमोर नंबर लावण्यास सुरुवात केली होती. सोमवारी देखील सकाळी सहा - सात वाजल्यापासून शहरातील दारुच्या दुकानाबाहेर तळीरामांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

कोरोना संक्रमणशील भागात जीवनावश्यक वस्तुखेरीज इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त असणारी सतत सुरु असणारी गस्त यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र याच्या उलट चित्र शहरातील डेक्कन, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता आणि ताडीवाला रस्त्यांवर असणा-या दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांची लांबवर रांग लागली होती. विशेष म्हणजे फिजिकल डिस्टन्स न ठेवता दुकानाच्या बाहेर गर्दी केल्याने त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली होती. 
 रांगेत असणा-या लोकांनी बेशिस्तपणे वागण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला. अनेकजण रांग मोडून दारु घेण्यासाठी धडपडत होते. यावेळी रांगेतील नागरिकांबरोबर हुज्जत, भांडण्याचा प्रसंग काहींवर ओढावला होता. काही करुन दारु हवी यासाठी तळीराम एकापेक्षा एक कल्पना लढवत होते. आपला नंबर लवकर यावा यासाठी अफवा पसरवणे, पोलीस आले आहेत असे खोटे सांगणे, स्टॉक संपल्याचे सांगणे, व्हाटसअपवरील खोटे सरकारी आदेश दाखवत होते. 

* पोलिसांचा मार खाऊन देखील पुन्हा रांगेत उभे 
डेक्कन, फर्ग्युसन्न रस्त्यावर दुपारच्या वेळी सुरु असणाऱ्या दारुच्या दुकानाबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. अशावेळी कुठलेही नियम न पाळता, शिस्तीचे पालन न करता तळीराम दारुसाठी भर उन्हात रांगेत उभे होते. याप्रसंगी रांग मोडून मध्येच घुसणाऱ्यांमुळे भांडणाची स्थिती निर्माण होत होती. अखेर पोलिसांनी त्या भागातील दारुचे दुकान बंद करुन लोकांना घरी जाण्यास सांगितले. पोलीस थोड्यावेळाने जातील आणि दारु मिळेल या आशेवर कित्येकजण पुन्हा रांगेत उभे राहिले. तळीराम ऐकत नाहीत म्हटल्यावर नाईलजाने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यात पोलिसांचा मार खाऊन देखील तळीराम रांगेत उभे राहत असल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले.

Web Title: Crowd on front wine shop of pune city from Every thing for liquar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.