देखावे पाहण्यासाठी ओसंडली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 06:28 AM2017-09-01T06:28:53+5:302017-09-01T06:29:02+5:30
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहराच्या मध्यवस्तीमध्ये भाविकांचा अक्षरश: महापूर उसळला होता. गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर मंडळांचे देखावे पाहायला बाहेर पडलेल्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते.
पुणे : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहराच्या मध्यवस्तीमध्ये भाविकांचा अक्षरश: महापूर उसळला होता. गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर मंडळांचे देखावे पाहायला बाहेर पडलेल्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. ‘पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा’, ‘माझ्या गणानं घुंगरू हरीवलं’, ‘गणपती राया, पडते मी पाया’ या गाण्यांसह अष्टविनायक चित्रपटातील गाण्यांमुळे वातावरणही गणेशमय झालेले होते.
पुण्याचा गणेशोत्सव देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. शहरातील मंडळांकडून सादर केल्या जाणाºया देखाव्यांचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणारे देखावे मंडळांकडून सादर करण्यात येत असतात. ऐतिहासिक, पौराणिक आणि काल्पनिक विषयांवरील हलत्या व जिवंत देखाव्यांना कायमच पसंती मिळते. गणेश चतुर्थीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या सात दिवसांत दररोज पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, गर्दी वाढतच गेली. घरच्या गणपतींचे गौरींसह गुरुवारी विसर्जन झाले. त्यानंतर आबालवृद्ध देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते.
श्रीमंत दगडूशेठ गणपती, बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळांच्या सजावटींची श्रीमंती भाविकांना अनुभवायला मिळाली. छत्रपती राजाराम मंडळ, खजिना विहीर मंडळ, विश्रामबागवाडा मंडळ, शनिपार मंडळासह सदाशिव, शनिवार, नारायण, रविवार, गुरुवार, शुक्रवार या पेठांतील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गुरुवारी रात्री गर्दी झाल्याचे चित्र होते.
दर वर्षीप्रमाणे बाजीराव रस्त्यावरच्या नातू बाग मित्र मंडळ आणि चिमण्या गणपती मंडळाने सादर केलेली विद्युतरोषणाई पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्त्यावरही भाविकांची गर्दी दाटली होती.
अनेक मंडळांनी संगीत कारंजे सादर केलेले आहे. देखणी प्रकाशव्यवस्था, रिमिक्स गाण्यांचा ठेका आणि त्यावर थिरकणाºया जलधारा पाहून गणेशभक्त आनंदित होत होते.
मुलांना खांद्यावर घेऊन जाणारे पालक, खेळण्यांसह विविध वस्तूंची दुकाने, बासरी-पिपाण्यांची विक्री, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वडापाव आणि भजीचा खमंग वास, पाणीपुरीची तिखटगोड चव अशा विविधरंगी वातावरणात गुरुवारचा दिवस पुणेकरांनी अनुभवला.
या वर्षी मंडळांनी तिसºया दिवसापासूनच देखावे खुले केल्याने पुणेकरांसह पुण्याबाहेरून आलेल्या भाविकांना पर्वणीच मिळाली
होती. अनेक पुणेकरांनी बाहेरून आलेल्या पाहुण्यांना मानाच्या
पाचही गणपतींसह प्रमुख मंडळांच्या गणपतींचे दर्शन घडविले. सातव्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्साहात भरच पडली.