सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 06:16 AM2017-09-03T06:16:58+5:302017-09-03T06:17:07+5:30
सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात गणेशभक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला. मानाच्या गणपतींचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांनी सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले.
पुणे : सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात गणेशभक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला. मानाच्या गणपतींचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांनी सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले. बाप्पाच्या जयघोषाने शहरभर उत्साह संचारला होता.
गणेशोत्सवातील शनिवारी नववा दिवस होता. गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पावसाने सातत्याने हजेरी लावली. तसेच, सुटीही नसल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी तुलनेने कमी गर्दी होती. मात्र, काही दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. तसेच शनिवार व रविवारी सलग दोन दिवस शाळा व शासकीय कार्यालयांना सुटी आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी गौरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडू लागले. बाहेरगावांहून खास देखावे पाहण्यासाठी शहरात येणाºया गणेशभक्तांची संख्याही दर वर्षी मोठी असते. त्यामुळे शनिवारी प्रामुख्याने शहराच्या मध्य भागात देखावे पाहण्यासाठी मोठी
गर्दी झाली. यंदाच्या गणेशोत्सवात शनिवारी पहिल्यांदाच गर्दीचा महापूर आला. तरुण-तरुणींसह अनेक
जणांनी सहकुटुंब देखावे पाहण्याचा आनंद लुटला.
शनिवारी दुपारनंतरच शहरात गर्दी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सायंकाळनंतर वाहतूक पोलिसांकडून काही रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात आली. प्रामुख्याने मानाच्या पाचही गणपतींसह आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनास भक्तांनी गर्दी केली होती. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता गर्दीने फुलून गेले.
सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ यांसह परिसरातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. जिवंत देखाव्यांसह, सामाजिक, पौराणिक, विद्युतरोषणाईच्या देखाव्यांसमोर मोठी गर्दी होत होती. रविवारी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.