अलंकापुरीत ‘इंद्रायणी’च्या घाटावर छठपूजेस उत्तर भारतीयांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:18 PM2018-11-13T23:18:37+5:302018-11-13T23:19:42+5:30
छठपूजेनिमित्त बुधवारी (दि. १३) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यात आले. नदी तसेच जलाशयात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यास छठपूजा व्रतात महत्त्व आहे.
आळंदी : येथील इंद्रायणी नदीघाटावर छठपूजा व्रतास राष्ट्रीय उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहात गर्दी करून इंद्रायणी नदीच्या घाटावर दुतर्फा छठपूजा केली. यानिमित्त आळंदी नदीघाटावर फटाक्यांची आतषबाजी, दीपोत्सव आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. सुमारे २० हजारांवर नागरिकांनी नदीघाटावर गर्दी केली.
छठपूजेनिमित्त बुधवारी (दि. १३) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यात आले. नदी तसेच जलाशयात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यास छठपूजा व्रतात महत्त्व आहे. यामुळे आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदीचे दुतर्फा उत्तर भारतीय नागरिक भाविकांनी गर्दी केली. यावेळी आळंदी परिसरातून तसेच भोसरी, पिंपरी-चिंचवड, चिंचवड परिसरातून नागरिक आले होते. आळंदी येथील विश्वरूपदर्शन मंचावर स्वागत कक्षासह स्वागत समारंभाचे प्रथमच आयोजन करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय उत्तर भारतीय संघ व जगद्गुरु स्वामी शंकराचार्य समितीने नियोजन केले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितीन अप्पा काळजे, उद्योजक सुधीरकुमार शर्मा, काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, माजी नगरसेवक मदनलाल बोरुंदीया, तसेच उत्तर भारतीय नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय उत्तर भारतीय संघ यांच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. शांतता व सुव्यवस्थेसाठी इंद्रायणी नदीघाटावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.