Khadakwasla Dam | काठावर जाळ्या लागतीलही, मनाला ब्रेक लागणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 09:57 AM2023-05-17T09:57:41+5:302023-05-17T10:00:42+5:30

जलसंपदा विभागाने काठावर कितीही जाळ्या उभ्या केल्या, तरी पर्यटकांनी मनाला जाळी लावणे गरजेचे आहे, तरच हा जीवघेणा खेळ थांबणार आहे...

Crowd of tourists in Khadakwasla dam area despite ban; Failure to take precautions leads to casualties | Khadakwasla Dam | काठावर जाळ्या लागतीलही, मनाला ब्रेक लागणार कधी?

Khadakwasla Dam | काठावर जाळ्या लागतीलही, मनाला ब्रेक लागणार कधी?

googlenewsNext

श्रीकिशन काळे/आशिष काळे

पुणे : पाण्यात जाऊन खेळणं, पाय बुडवणं, त्यात पोहणं हे प्रत्येकाला आवडतं. पण हा आनंद कुठे अनुभवावा याविषयी गांभीर्य असणे आवश्यक आहे. खडकवासलाधरण क्षेत्रातील पाण्यात उतरण्यास बंदी असतानाही शनिवार-रविवार नागरिक तेथे जाऊन खेळ करतात. हा पाण्यात खेळण्याचा जीवघेणा प्रकार थांबणार नाही, तोपर्यंत बुडून मृत्यू होण्याचा प्रकार घडतच राहणार आहे. जलसंपदा विभागाने काठावर कितीही जाळ्या उभ्या केल्या, तरी पर्यटकांनी मनाला जाळी लावणे गरजेचे आहे, तरच हा जीवघेणा खेळ थांबणार आहे.

खडकवासलाधरणक्षेत्रात बुडून मृत्यू होण्याच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. शनिवारीच एक मुलगा कॅनॉलमध्ये पोहत असताना वाहून गेला आणि जीवाला मुकला. तसेच खडकवासला बॅकवॉटरमध्ये बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला. यानंतर प्रशासन खडबडून जागे हाेईल, काही उपाययाेजनाही केल्या जातील; खरा प्रश्न आहे ताे अशा घटना थांबणार कधी आणि कसे?

खरं तर जलसंपदा विभागाने खडकवासला बॅकवॉटर आणि चौपाटी या ठिकाणी पाण्यात जाण्यासाठी बंदी घातली आहे. तसेच चौपाटीच्या काठावर जाळ्याही उभारल्या आहेत. तरी देखील पर्यटक छोट्या रस्त्यातून पाण्यात जातात. लहान मुले, तरुण-तरुणी असे सर्वजण त्या ठिकाणी जाऊन खेळतात. हा प्रकारच कोणाच्या तरी जिवावर बेततो.

सर्वच पातळीवर घेतली जावी खबरदारी :

पर्यटकांनीच गांभीर्याने पाण्यात न जाण्याचे टाळले पाहिजे. प्रशासन कुठे-कुठे लक्ष देणार आहे. आम्ही खडकवासला धरणाच्या २० किलोमीटरच्या क्षेत्रावर कडक नियम बनविण्याचा विचार करत आहोत. तेथील चौपाटीवर असणाऱ्या विक्रेत्यांनीही पर्यटकांना समजावून सांगितले पाहिजे. कारण हे काम सर्वांनी मिळून करण्याचे आहे. केवळ एका गोष्टीमुळे हा प्रकार थांबणार नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांतील धरणक्षेत्रातील घटना

०३ एप्रिल २०२२ : योगेश नवले या तरुणाचा मृत्यू

२१ डिसेंबर २०२२ : तरुण-तरुणीचा मृत्यू

२० फेब्रुवारी २०२३ : फरहान शेख, साहिल ठकार या दोघांचा मृत्यू

०७ एप्रिल २०२३ : मोहित सराफचा मृत्यू

१३ मे २०२३ : झुबेर शेख वाहून गेला

१४ मे २०२३ : खुशी खुर्दे, शीतल टिंटोरे या दोघींचा मृत्यू

पाण्यात गेल्यास ५०० रुपये दंड :

धरणाच्या पाण्यात पर्यटकांनी जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी खास शनिवार-रविवार दहा सुरक्षारक्षक नेमण्यात येतात. परंतु, धरणक्षेत्राचा परिसर प्रचंड मोठा आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नाही. जे पाण्यात जातील त्यांना ५०० रुपये दंड देखील करण्यात येतो, तरीही पर्यटक थेट पाण्यात जात आहेत.

स्वयंशिस्त पाळावी

- नागरिकांनी धरणाच्या पाण्यात जाऊ नये

- पाण्यातील खेळ जिवावर बेतू शकतो

- धरणक्षेत्र मोठे असल्याने नाही बंधन

- थोडा वेळचा आनंद घेईल जीव

सध्या उन्हाळी सुट्या आहेत. त्यामुळे धरणक्षेत्रात खूप जण कुटुंबासह येतात. ते उत्साहात पाण्यात उतरतात. पाण्याची खाेली माहीत नसते. धरणक्षेत्र म्हणजे दलदल खूप. ते काही जलतरण तलावासारखे नसते. त्यामुळे पाण्यात गेल्यानंतर कोणी बुडाले तर तो खाली गाळात अडकू शकतो किंवा पाण्यात खेळताना खोलीचा अंदाज न आल्याने बुडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जायचे टाळले पाहिजे. धरणक्षेत्रापेक्षा कॅनॉलमध्ये सध्या ठिकठिकाणी खूप मुले पोहताना दिसतात. त्यामध्ये अधिक वाहून जाण्याचे प्रमाण आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य असते.

- विलास पाटील, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

अनेकजण मजा म्हणून धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जातात. त्यामुळे बुडून मृत्यू होण्याची दुर्घटना घडते. ७ एप्रिल रोजी देखील मोहित सराफ हा दोन मित्रांसह पाण्यात उतरला होता. खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आम्ही १४ तास शोधत होतो.

- तानाजी भोसले, सदस्य, वन्यजीव बचाव पथक

धरणक्षेत्राच्या बॅकवॉटरला पोहताना खूप स्टॅमिना लागतो. कारण पाणी शांत असते, ते तोडता येणे खूप अवघड असते. त्यामुळे पट्टीचे पोहणाऱ्यांनाही खूप अवघड जाते. नवीन पोहणाऱ्यांनी तर जाऊच नये. कॅनॉलमध्ये अनेकजण पोहतात. तिथे पाण्याचा प्रवाह असतो. त्यामुळे त्या प्रवाहासोबत पोहता यायला हवे. कॅनॉलमध्ये पोहताना पट्टीचा शिकवणाराच हवा. इतरांनी जाऊ नये.

- हर्षद इनामदार, स्विमिंग ट्रेनर

Web Title: Crowd of tourists in Khadakwasla dam area despite ban; Failure to take precautions leads to casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.