पर्यटकांच्या गर्दीने भुशी धरण हाउसफुल्ल
By admin | Published: July 28, 2014 04:37 AM2014-07-28T04:37:52+5:302014-07-28T04:37:52+5:30
पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आज सकाळपासून पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते
लोणावळा : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आज सकाळपासून पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते. पर्यटक, तसेच त्यांच्या वाहनांच्या गर्दीने राष्ट्रीय महामार्ग व भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पाच ते सहा किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील ही वाहतूककोडी सोडविण्यासाठी दुपारी २.३० ला राष्ट्रीय महामार्गावरून शहरात, तसेच धरणाकडे वाहनबंदी करण्यात आली होती.
वर्षाविहारासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने निर्माण होत असलेली वाहतूककोंडी शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. आजच्या पर्यटकांमध्ये पुणेकरांची संख्या प्रचंड होती. सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत लोणावळ्यात येणाऱ्या सर्व लोकलगाड्या पर्यटकांनी भरून येत होत्या. यामुळे धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पायी चालणाऱ्यांची अक्षरश: रांग लागली होती. लोणावळ्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्व धबधबे पर्यटकांनी गजबजले होते. सहारा पूल धबधबा व भुशी गावाजवळच्या धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. भुशी धरणाप्रमाणेच लायन्स पॉइंट, खंडाळा येथील राजमाची गार्डन, भाजे लेणी परिसरातील धबधबा, दुधिवरे खिंडीतील धबधबा व कार्ला लेणी परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात होता. मात्र, पर्यटकांच्या प्रचंड गर्दीसमोर पोलीसही हतबल झाले होते.(वार्ताहर)