कुंजीरवाडीत लसीकरणासाठी गर्दी, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:32+5:302021-04-09T04:10:32+5:30
---- थेऊर : कुंजीरवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या कोविड लसीकरण सुरू असून, या केंद्रातर्गत कुंजीरवाडी, म्हातोबा आळंदी, तरडे, ...
----
थेऊर : कुंजीरवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या कोविड लसीकरण सुरू असून, या केंद्रातर्गत कुंजीरवाडी, म्हातोबा आळंदी, तरडे, सोरतापवाडी, नायगाव, थेऊर अशी गावे येतात. या गावांची लोकसंख्या जास्त असल्याने व कुंजीरवाडी आरोग्य केंद्राकडे मनुष्यबळ कमी असल्याने तेथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून लसीकरण प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आळंदी म्हातोबासह इतर उपकेंद्रामध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी होत आहे.
सध्या कुंजीरवाडी या केंद्रांतर्गत येणाऱ्या थेऊर या एकाच उपकेंद्रावर लसीकरण सुरू असून इतर उपकेंद्रावर असे लसीकरण का होऊ शकत नाही, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून त्यात असेही रुग्ण आहेत की ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. एकाच केंद्रावर होणारी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी हे लसीकरणाचे केंद्र वाढविले तर कमी होऊ शकते, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परंतु कुंजीरवाडी या ठिकाणी कमी प्रमाणात मनुष्यबळ असल्याकारणाने तेथील अधिकारी या कामासाठी उत्सुक नाहीत, असे सांगताना वरिष्ठांच्या कोर्टात परवानगीचा चेंडू त्यांनी ढकलला आहे. लसींचा तुटवडा सध्या सर्व पुणे जिल्ह्यात जाणवत असल्याने परिसरातील अनेक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत. आळंदी म्हातोबा व तरडे हे डोंगर परिसरात पसरलेली गावे असून वाड्यावस्त्यांवरून येण्यासाठी रस्तेच नसताना हे लोक कुंजीरवाडी केंद्रावर येणार कसे हा प्रश्न आहे. त्यामुळे इतर उपकेंद्रावर देखील त्वरित लसीकरण सुरू करण्यात यावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
-
कोट -१
आम्हाला वरिष्ठांकडून ज्या पद्धतीने आदेश आले त्याप्रमाणे आम्ही लसीकरण कुंजीरवाडी व थेऊर केंद्रावर करत आहोत. इतर गावे लसीकरण केंद्र म्हणून सुचविण्याचा अधिकार आमच्याकडे नसून वरिष्ठांनी जर आदेश दिले तर आम्ही नक्की इतर उपकेंद्रावर देखील लसीकरण सुरु करू. इतर उपकेंद्रांची नावे आम्ही सुचवली नसून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यवाही करत आहोत.
- डॉ. मेहबूूब लुकडे,
कुंजीरवाडी,
प्राथमिक आरोग्य केंद्र
--
कोट -२
आळंदी म्हातोबा ग्रामस्थ कुंजीरवाडीतील केंद्रावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे व लांबलचक रांगेमुळे अगोदरच वयोवृद्ध लोक बेहाल झालेले असून एकीकडे जमावबंदी असताना इथे मात्र गर्दीमध्ये घुसावे लागत आहे. आम्ही कोरोना होऊ नये म्हणून लस घेत आहोत की तिथून कोरोना घरी घेऊन येत आहे हे आम्हाला कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे आमच्या गावात लसीकरण केंद्र द्यावे ही प्रशासनास नम्र विनंती.
ग्रामस्थ