कुरकुंभ येथे लसीकरणासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:21+5:302021-05-10T04:11:21+5:30
कुरकुंभ येथील ग्रामस्थांना लस मिळत नसल्याची तक्रार स्थानिक तरुणांनी करीत वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशावर्कर ...
कुरकुंभ येथील ग्रामस्थांना लस मिळत नसल्याची तक्रार स्थानिक तरुणांनी करीत वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशावर्कर त्यांच्या संपर्कातील लोकांना नंबर असलेल्या चिठ्ठीचे वाटप करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक ग्रामस्थ आपल्या पाहुण्यांना लस देण्यासाठी नंबर मिळवून देत असल्याचे देखील प्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना वारंवार केंद्रावरून मोकळ्या हाताने माघारी जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, सरपंच राहुल भोसले यांनी देखील येऊन सर्वांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले.
याबाबत वैद्यकीय अधिकारी उत्तम कांबळे यांनी स्थानिक ग्रामस्थांना ऑफलाईन लस उपलब्ध नसल्याने ऑनलाइन नंबरसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन प्रक्रियेत कुरकुंभ केंद्रावर लस घेण्यासाठी शहरातील नागरिकांना मेसेज येत असल्याने पुणे व परिसरातील नागरिक गर्दी करीत आहे. त्यातच स्थानिक ग्रामस्थ येऊन देखील लसीकरणाची विचारपूस करीत आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीने लस घेण्याऐवजी कोरोनाची लागण होण्याची चिन्हे आहेत.
०९ कुरकुंभ
कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.