गर्दी, वाहनांनी वाढविले ध्वनिप्रदूषण; गोंगाट ८० डेसिबलच्या पुढे: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:30 AM2017-09-04T02:30:30+5:302017-09-04T02:30:53+5:30
गणेशोत्सवात ढोल-ताशांचा निनाद तसेच डीजेच्या दणदणाटाने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. पण याशिवाय देखावे पाहण्यासाठी वाढलेली गर्दी, वाहनांची संख्या, तसेच काही मंडळांच्या देखाव्यांमध्ये सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकांचीही ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे.
पुणे : गणेशोत्सवात ढोल-ताशांचा निनाद तसेच डीजेच्या दणदणाटाने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. पण याशिवाय देखावे पाहण्यासाठी वाढलेली गर्दी, वाहनांची संख्या, तसेच काही मंडळांच्या देखाव्यांमध्ये सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकांचीही ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. हा गोंगाट ८० डेसिबलच्या पुढे गेल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून गणेशोत्सवापूर्वी, गणेशोत्सवादरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण मोजण्याचे काम केले जाते. यंदाही विद्यार्थ्यांकडून ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या सरावाच्या वेळी आवाजाच्या नोंदी घेतल्या होत्या. यामध्ये ध्वनिप्रदूषणाची पातळी ७० ते ७५ पर्यंत नोंदविली गेली होती. काही ठिकाणी ही पातळी ८० डेसिबलपर्यंत गेली होती. मात्र, गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या वेळी घेतलेल्या नोंदींमध्ये ही पातळी काही ठिकाणी ८८ डेसिबलपर्यंतही गेल्याचे समोर आले आहे.
नीलेश वाणी व प्रवीण शिवपुजे या विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री ९ नंतर टिळक रस्त्यावर विविध ठिकाणी आवाजाच्या नोंदी घेतल्या आहेत. टिळक चौकामध्ये घेतलेल्या नोंदीमध्ये ध्वनिप्रदूषणाची सरासरी पातळी ८०.२९ डेसिबलएवढी नोंदविली गेली आहे, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिसरात सर्वाधिक ८८.१३ डेसिबलपर्यंत हा गोंगाट असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले.
शनिवारी देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्याही वाढली होती. त्यामुळे रस्त्यावर गोंगाट वाढला. काही ठिकाणी
मंडळांच्या ध्वनिक्षेपकामुळे यात भर पडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ध्वनिप्रदूषणाची सुरक्षित पातळी ५५ ते ६५ डेसिबल अशी धरली जाते. रात्रीच्या वेळी ही पातळी ५५ असते. पण त्यापेक्षा ३० ते ३५ डेसिबलने अधिक ध्वनिप्रदूषण नोंदविले गेले आहे, असे महाविद्यालयातील महेश शिंदीकर यांनी सांगितले.