बांधकामाच्या नोंदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:03+5:302020-12-27T04:08:03+5:30
-- आव्हाळवाडी : वाघोलीचा महिनाभरात पुणे महापालिकेत समावेश होणार असल्याने बांधकामाच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी करण्यासाठी वाघोलीतील नागरिकांची मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायत ...
--
आव्हाळवाडी : वाघोलीचा महिनाभरात पुणे महापालिकेत समावेश होणार असल्याने बांधकामाच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी करण्यासाठी वाघोलीतील नागरिकांची मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत. होणाऱ्या गर्दीमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत असल्याने गर्दी टाळण्यासाठी टोकण पद्धत राबविण्यात येणार आहे. आठवड्यातील एक दिवस प्रत्येक वार्डला विभागून देण्यात आला आहे.
वाघोलीसह २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात दोन दिवसापूर्वी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सूचना व हरकतीसाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तोपर्यंत वाघोली ग्रामपंचायत सर्व कारभार असणार आहे. २५ जानेवारीला वाघोली महापालिकेत असेल असे सूतोवाच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पूर्वी दिले होते. वाघोलीचा महापालिकेत समावेश होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याने बांधकामाची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी अनेक नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. अचानक होणारी गर्दी आणि नोंदीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या जास्त असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पायाला भिंगरी लावल्यासारखे धावपळ करत आहेत. गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने टोकन पद्धत राबविण्यात येणार आहे. आठवड्याच्या वार नुसार वार्डला एक दिवस दिला जाणार आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये चौकशी करून दिलेला दिवस व वेळेनुसार उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
--
चौकट :
ग्रामपंचायतमध्ये बांधकामाचे नोंदणी करीत असताना नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत आहेत. ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या देखील नागरिकांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात फेऱ्या वाढल्या आहेत. काही ग्रामपंचायत सदस्य नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतीत मांडून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
--
प्रतिक्रिया :
वाघोली ग्रामपंचायतीचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये होण्यासाठी २५ जानेवारी पर्यंतचा कालावधी आहे. एक महिना ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीतपणे चालू राहणार आहे. नागरिकांच्या घराच्या नोंदी शंभर टक्के करण्याचा ग्रामपंचायत पूर्णपणे प्रयत्न करत आहे. नोंदीसाठी टोकण पद्धतीने नोंदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये विनाकारण गर्दी करू नये. - सरपंच , ग्रामपंचायत सदस्य, वाघोली