Gudhi Padwa: गुढीपाडव्यानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी; विविध रंगांच्या गाठींसह ड्रायफ्रूट गाठींना मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:43 AM2023-03-20T09:43:45+5:302023-03-20T09:43:54+5:30
गुढीपाडव्यानिमित्त बाजारात लाल, पिवळा, नारंगी अन् पांढऱ्या रंगांच्या साखरेच्या गाठींसह ड्रायफ्रुटच्या आकर्षक गाठींनी दुकाने सजली
पुणे : गुढीपाडव्याच्या सणाला अवघे दोन दिवस उरल्याने साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी मार्केटयार्ड, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मंडईसह इतर बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रंगांतील गाठींसह ड्रायफ्रूट असलेल्या साखर गाठी अन् विविध प्रकारांतील गाठींना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. पूजेचे साहित्य, गाठी, गुढी खरेदीसाठी महिलांची मंडई, मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
गुढीपाडव्यानिमित्त बाजारात लाल, पिवळा, नारंगी अन् पांढऱ्या रंगांच्या साखरेच्या गाठींसह ड्रायफ्रुटच्या आकर्षक गाठींनी दुकाने सजली आहेत. एक गाठ २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर आर्कषक ड्रायफ्रुटच्या गाठीच्या दर १०० ते २०० पर्यंत लांबीनुसार विक्री केली जात आहे.
लहान गुड्यांच्या खरेदीला प्रतिसाद
लहान आर्कषक दिसणाऱ्या गुड्यांच्या खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून, १०० ते २०० पर्यंत आकारानुसार गुढी विक्री केली जात आहे. या तयार गुढ्यांचा कार आणि घरात पूजेसाठी वापर करीत आहेत.
''गाठींचा पारंपरिक व्यवसाय करीत असून, कारखान्यात साखर गाठी बनविल्या जातात. कारखान्यांमधून गाठी आणून होलसेल भावात आम्ही विकतो. - संजय तोडवलकर, व्यावसायिक शुक्रवार पेठ''
''मंडईत गुढीपाडवा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. गाठी, लहान आकारातील तयार गुद्यांची खरेदी-होत होती. दरवर्षी गुढी तयार घेतो. अगरबत्तीपासून ते हळदी-कुंकू, गाठीसह अन्य साहित्य खरेदी करीत आनंद घेतला.- चेतना वायदंडे, धनकवडी.''