पोषण आहार निधीसाठी विद्यार्थ्यांची बँकेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:51+5:302021-07-01T04:09:51+5:30
सासवड : उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचा आर्थिक भत्ता थेट लाभ हस्तांतरण (dbt) तत्त्वावर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ...
सासवड : उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचा आर्थिक भत्ता थेट लाभ हस्तांतरण (dbt) तत्त्वावर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा फतवा प्राथमिक शिक्षण संचालयाने काढला असून बँक खाती नसणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडण्याचे निर्देश दिल्याने ग्रामीण भागांतील बहुतांश बँकांत विद्यार्थ्यांची व पालकांची गर्दी उसळली आहे.
या खात्यांसाठी खूप कमी वेळ दिला असल्याने कागदपत्रे जमा करून खाती उघडण्यासाठी पालकांची दमछाक होत आहे. बँकांचे जून तिमाहीची कामे सुरू असून त्यात या कामाची भर व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळणारी रक्कम ही नाममात्र असून मुलांना व पालकांना सध्या आधार कार्ड, फोटो, खाते उघडण्यासाठी शुल्क, वेळेचा अपव्यय, शेतीच्या कामांचा हंगाम असून पालकांची धावपळ, खर्च अशी कसरत करावी लागत आहे. यापूर्वीही शालेय गणवेशांसाठी अशीच खाती उघडण्याची मोहीम राबवली गेली होती पण ती योजनाही फारशी यशस्वी झाल्याचे आढळून आले नाही. शासन निर्णय घेते व तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही करते तथापि ग्रामीण भागातील करोनाच्या पार्शवभूमीवरील एकूण आर्थिक स्थिती याबाबत फारसा गांभीर्याने विचार करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालक वर्गात याबाबत कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
--
फोटो क्रमांक : ३० सासवड बॅंक खात्यात गर्दी
फोटो.. विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्यासाठी गर्दी होत आहे.