आदिवासी गावात लसीकरणासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:12+5:302021-09-02T04:22:12+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात कोरोना लसीकरण होणे गरजेचे होते. कोरोना आढावा बैठकीत या भागातील लसीकरण तातडीने करून घ्यावे, ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात कोरोना लसीकरण होणे गरजेचे होते. कोरोना आढावा बैठकीत या भागातील लसीकरण तातडीने करून घ्यावे, अशी सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली होती. या दुर्गम भागात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका असल्याने लसीकरण करणे गरजेचे होते. आज झालेल्या महालसीकरणमध्ये पश्चिम आदिवासी पट्ट्यातील कोंढवळ, आडिवरे, पंचाळे, राजपूर, कुशिरे, पाटण, जांभोरी यासह छोट्या मोठ्या गावात लसीकरण करण्यात आले. लसीकरणाची आकडेवारी ही दिलासा देणारी आहे. विशेष म्हणजे लसीकरण करणाऱ्या पथकाने वेळेत पोहचून लसीकरण करून घेतले आहे. या भागातील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी उत्साह दिसून आला. तसाच काहीसा प्रकार तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, लाखणगाव, पहाडदरा, वडगाव पिर या गावातही दिसून आला. तेथेही लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पहाडदरा येथे दुर्गम भाग असूनही नागरिकांनी लसीकरण करून घेतले. ठाकर समाजातील अनेक व्यक्ती लसीकरण करून घेत होत्या. तालुक्याच्या बहुतेक गावांमध्ये लसीकरणासाठी उत्साह दिसून आला. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा हे या भागातील लसीकरण मोहिमेवर स्वतः लक्ष ठेवून होते. या महालसीकरण मोहिमेसाठी शिक्षकांनी चांगले योगदान दिले, अशी माहिती आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व मंगेश जावळे यांनी दिली.
फोटोखाली: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पहाडदरा या गावात लसीकरण उत्साहात पार पडले.