विकासाला सीआरएसचा बूस्ट
By admin | Published: October 16, 2015 01:32 AM2015-10-16T01:32:08+5:302015-10-16T01:32:08+5:30
शहरात असलेल्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)अंतर्गत १,५०० कोटी रुपयांचा फंड उभा राहू शकेल
पुणे : शहरात असलेल्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)अंतर्गत १,५०० कोटी रुपयांचा फंड उभा राहू शकेल. सीएसआरचा फंड एकत्रितपणे गोळा करून तो आवश्यक गरजांवर खर्च करण्यासाठी पुणे कनेक्ट या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याशी महापालिकेच्या वतीने करार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
खासगी कंपन्यांना दर वर्षी मिळणाऱ्या नफ्याच्या २ टक्के रक्कम सीएसआरअंतर्गत खर्च करावी लागते. सीएसआर फंडाची रक्कम नेमक्या कशावर खर्च करायची, याबाबत कंपन्यांमध्ये द्विधा मन:स्थिती असते. त्यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील २८ प्रमुख कंपन्यांनी एकत्र येऊन पुणे सिटी कनेक्ट या ‘ना नफा’ तत्त्वावर काम करणाऱ्या कंपनीची स्थापना केली आहे. ही कंपनी पालिकेच्या गरजांवर सीएसआर फंडाच्या रकमेतून पैसे खर्च करणार आहे. गुरुवारी सीएसआर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी आयुक्तांची बैठक झाली. तीमध्ये पुणे कनेक्ट कंपनीशी करार करण्यावर चर्चा करण्यात आली. सध्या पुणे कनेक्टमध्ये २८ कंपन्या सहभागी झाल्या असल्या, तरी नजीकच्या काळात आणखी कंपन्या सहभागी होणार आहेत.
>> सीएसआरअंतर्गत पैसे नेमके कुठे खर्च करायचे, महापालिकेच्या महत्त्वाच्या गरजा कोणत्या आहेत, याची कंपन्यांना फारशी माहिती नसते. शहरात असलेल्या हजारो कंपन्यांना पालिकेकडून माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर, सगळ्या कंपन्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पुणे कनेक्ट कंपनी स्थापन करण्यात आली आहे.’’
- कुणाल कुमार, आयुक्त