दौंडमध्ये डॉक्टरांकडून निर्दयी कृत्य! प्रसुती दरम्यान महिलेला मारहाण, घटनेच्या ३ दिवसानंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 09:03 PM2021-10-17T21:03:28+5:302021-10-17T21:11:57+5:30
बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या गरोदर महिलेला प्रसुती होताना डॉक्टरांनी अमानुष मारहाण केल्याची घटना यवत मध्ये घडली आहे.
यवत : बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या गरोदर महिलेला प्रसुती होताना डॉक्टरांनी अमानुष मारहाण केल्याची घटना यवत मध्ये घडली आहे. याबाबत तीन दिवसांनी महिलेने पोलिसांना तक्रार दिल्यानंतर काल (दि.१६) रोजी रात्री संबंधित डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरोदर असलेल्या पूजा गोरख दळवी (वय - २६, रा.खामगाव , दळवी वस्ती , ता.दौंड) यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता यवत येथील जयवंत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना प्रसुती दरम्यान महिलेच्या तोंडावर, हातांवर ,डोक्यावर, मांडीवर, ओठांवर, चापटाने व बुक्याने मारहाण केली. यामुळे संबंधित गरोदर महिलेच्या चेहऱ्यावर काळ्या निळ्या रंगाचा जखमा झाल्या असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नातेवाईक महिलेच्या तब्बेतीच्या भीतीपोटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊ शकत नव्हते
तत्पूर्वी काल सायंकाळी संबंधित मारहाण झालेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्यानंतर खामगाव मधील दोनशे ते तीनशे लोक यवत येथील जयवंत हॉस्पिटल समोर गर्दी केली होती. गुरुवार (दि.१४) रोजी बाळंत होत असताना बेदम मारहाण झालेली असताना त्यांचे कुटुंब बाळंत महिलेच्या तब्बेतीच्या भीतीपोटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊ शकत नव्हते. असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी गावातील काही पुढारी व कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांचा रोष आणखीच वाढत होता. संबंधित ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे यवत पोलिसांचा समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमवला पांगविले.
यानंतर रात्री पीडित महिलेच्या पतीचा जबाब नोंदविण्यात आला. सदर जबाब घेताना काही नातेवाईकांनी हरकत घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. संबंधित गुन्हा दाखल करताना आलेला राजकीय दबाव , पोलिसांची टाळाटाळ व नंतर यवत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील महिलेची तपासणी करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
डॉक्टर म्हणतात घटना अपघाताने घडली
जयवंत हॉस्पिटलचे डॉ.चैतन्य भट यांना विचारले असता ते म्हणाले , संबंधित महिलेची प्रसुती नैसर्गिक होणे काहीसे अडचणीचे होते. मात्र मी माझ्या अनुभवावरून ती प्रयत्न केल्यास नैसर्गिक होईल याची खात्री मला वाटली होती. त्यासाठी मी प्रसुती कक्षात सर्वोतोपरी प्रयत्न केले. ते करत असताना महिलेच्या वाढत्या हालचाली मुळे व्यत्यय येत होता. महिलेला आवरत असताना मी घसरून पडलो यावेळी माझा कोपर तिच्या डोळ्याजवळ लागला. महिलेची प्रसूती नैसर्गिक व सुखरूप झालेली आहे. ही माझ्यासाठी महत्वाची बाब आहे. घडलेली घटना अपघाताने घडली आहे.