निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

By नितीश गोवंडे | Published: May 17, 2024 05:39 PM2024-05-17T17:39:23+5:302024-05-17T17:40:09+5:30

ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले, चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आले होते

Cruelly captured two camel traffickers Action of Sinhagad Road Police | निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

पुणे : शहरातून कर्नाटक येथे चित्रपटाच्या शुटिंगसाठी नेण्यात येणाऱ्या उंटांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पिंपरी-चिंचवडमधील रावेतमधून आठ ऊंट घेऊन कर्नाटककडे कत्तलीसाठी निघाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने ट्रक पकडण्यात आला. त्यावेळी उंट कत्तलीसाठी नव्हे तर चित्रपटाच्या शुटींगसाठी नेण्यात येत होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले.

अरुण कुमार चिनाप्पा (२८, रा. कुदपल्ली, जिल्हा कृष्णागिरी, कर्नाटक) आणि लखन मगन जाधव (३०, रा. करपटे वस्ती रोड, कलावती मंदीर शेजारी, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याबाबत कृष्णा तुळशीराम सातपुते (२४, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.
चिनाप्पा हा ट्रकचालक असून लखन हा ऊंट सवारीचे काम करतो. फिर्यादी सातपुते हे वारजे परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना १३ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दूरध्वनी करुन एका वाहनाबद्दल माहिती दिली. रावेतवरून एक ट्रक निघाला असून त्यामध्ये काही उंट निर्दयतेने कोंबण्यात आले आहेत. तसेच ते उंट कत्तलीसाठी कर्नाटक येथे नेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. त्यानंतर सातपुते आणि त्यांचे मित्र प्रसाद मारुती दुडे (२८, रा. वारजे), अशितोष सुरेश मारणे (२७, रा. नऱ्हे), अजय बसवराज भंडारी (२८, रा. भुगाव), सागर गोविंद धिडे (२८, रा. वारजे) हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात थांबले होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास चांदणी चौकाकडून येणारा ट्रक त्यांनी पाहिला. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला आणि वडगाव पुलाजवळ ट्रक थांबवण्यात आला. ट्रक चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीची चौकशी केली. चालकाने त्याचे नाव अरुण कुमार चिनाप्पा आणि शेजारी बसलेल्याने त्याचे नाव लखन जाधव असल्याचे सांगितले.

ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले. चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आले होते. उंटांचे पाय आणि तोंड निर्दयतेने बांधण्यात आलेले होते. ट्रकमध्ये चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांना जखमा झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींकडे उंटांच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांसह ट्रक आणि उंट देखील ताब्यात घेतले.

ऊंटाचा वापर जत्रा, कार्यक्रम, तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणात केला जातो. हे ऊंट कत्तलखान्यात नेण्यात येत नव्हते, मात्र त्यांची निर्दयीपणे वाहतुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - संभाजी पवार, पोलिस उपायुक्त

Web Title: Cruelly captured two camel traffickers Action of Sinhagad Road Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.