शहरातील खड्ड्यांवरून महापालिकेच्या मुख्यसभेत रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:51 PM2018-07-19T16:51:01+5:302018-07-19T17:05:32+5:30
शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून गुरूवारी महापालिकेच्या मुख्ये सभेत याविषयी तीव्र शब्दात पडसाद उमटले.
पुणे: सर आली धावून, रस्ते गेले वाहुन, खड्ड्यांमुळे पुणेकर त्रस्त... सत्ताधारी सुस्त, पुणेकरांना खड्ड्यात ढकलणा-या सत्ताधा-यांचा धिक्कार असो..अशी जोरदार घोषणाबाजी करून करत विरोधकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ केला. शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून गुरूवारी महापालिकेच्या वतीने मुख्य सभेत तीव्र शब्दात पडसाद उमटले. तसेच शहरातील सर्व रस्त्यांवर पडल्याने वाहतुक कोंडी होऊन पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. याला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. या मुख्य सभेत आऱोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना गदारोळात सभागृहनेते व उपमहापौर यांनी सत्ताधारी पक्षाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.
या सभेत विरोधकांनी सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.अनेक अपघातात सर्वसामान्यांचे बळीसुध्दा गेले आहे, तरीसुध्दा सत्ताधारी व प्रशासन ढिम्म अवस्थेत आहे. शहरात सध्या खड्ड्यात रस्ते की रस्त्यांत खड्डे असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. नियोजन शुन्य कारभाराचे हे परिणाम आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, सत्ताधारी बहुमतामुळे सुस्त झाले आहेत. तर प्रशासन पक्षपाती करत आहे. नागरिकांनी मग आपल्या समस्या कुणासमोर मांडायच्या हा प्रश्न आहे. सभागृहात शहरातील खड्ड्यांवर एकही सत्ताधारी बोलत नाही. त्यावर उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी माझ्या वॉर्डमध्ये खड्डे नाही असे सांगत हरकत घेतली. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, शहरात ३०-४०टक्के सिंमेट रस्ते झाले असून मुख्य रस्त्यांवर खड्डे नाहीत. गेल्या दोन वर्षांत खड्ड्यांचे प्रमाण कमी झाले. येणा-या काळात शहर खड्डे मुक्त होईल. या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना यांनी सत्तेत असलेल्या भाजपला लक्ष केले.