शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडा
By admin | Published: December 23, 2014 05:38 AM2014-12-23T05:38:19+5:302014-12-23T05:38:19+5:30
कोणत्याही गुन्हेगाराची आणि त्यांच्या पाठीराख्यांची भिडभाड न ठेवता गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडा, असा खणखणीत दम पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी
पुणे : कोणत्याही गुन्हेगाराची आणि त्यांच्या पाठीराख्यांची भिडभाड न ठेवता गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडा, असा खणखणीत दम पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे विषयक बैठकीत दिला. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीला नोव्हेंबर महिन्यात कुख्यात गजा मारणे आणि नीलेश घायवळ या दोन टोळ्यांमधील टोळीयुद्धातून शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्यांची दहशत पुन्हा पसरू लागली होती. पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा उचलत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केल्यामुळे पोलिसांना टीका सहन करावी लागली होती. गुन्हेगारांशी पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे असलेले संबंध गांभीर्याने घेत, यापुढे गुन्हेगारांशी पोलीस संपर्कात असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळांच्या सुरक्षेचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला.
शाळांच्या व्यवस्थापनाशी समन्वय ठेवून सिक्युरिटी आॅडिट करण्याच्या तसेच सीबीएससी बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार सुरक्षेसंदर्भात कार्यवाहीच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. शाळांनी सुरक्षारक्षक नेमणे, सीसीटीव्ही बसवणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी पोलिसांनी शाळांना भेटी देऊन माहिती घ्यावी.
ख्रिसमस, नववर्ष स्वागत तसेच जानेवारी महिन्यातील ईद यानिमित्ताने आपापल्या हद्दीतील कायदा सुव्यवस्था राखणे, कोणतीही अनुचित घटना
होऊ न देणे यासाठी जागरूकता बाळगावी. कार्यक्रमांना परवानगी देताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही पोलीस आयुक्तांनी दिल्या. अल्पवयीन मुलांच्याही पार्ट्याही होतात, त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)