९० कारखान्यांचे गाळप सुरु, ९९ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:41+5:302020-11-26T04:26:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील १९० कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडून यंदा गाळपाची परवानगी घेतली आहे. त्यापैकी ९० कारखाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील १९० कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडून यंदा गाळपाची परवानगी घेतली आहे. त्यापैकी ९० कारखाने सुरूही झाले आहेत. सर्व कारखाने सुरू झाल्यास यंदा १० लाख मेट्रीक टन गाळप इथेनॉलकडे वळवूनही ९९ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल. मागील वर्षीची ६२ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असल्याने साखर अतिरिक्त होणार आहे, मात्र दरावर सरकारी बंधन असल्याने किलोमागचे दर स्थिर राहतील, असे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील १८ कारखान्यांनी अजूनही गेल्यावर्षीची ऊसापोटी देय ४२ कोटींची किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली आहे. यातल्या ११ कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी ठेवली होती. त्यातील ४ कारखान्यांची सुनावणी झाली असून त्यांनी थकीत एफआरपी त्वरीत देण्याचे मान्य केले आहे. एफआरपी दिल्याशिवाय गाळपाची परवानगी मिळत नसल्याने बहुसंख्य कारखान्यांनी ती अदा केली असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
यंदाचे ९९ लाख व मागील वर्षीचे ६२ लाख अशी एकूण १६१ लाख मेट्रिक टन साखर यंदा उपलब्ध असेल. राज्याची साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन आहे. यंदा आतापर्यंत ९० कारखान्यांनी १३० लाख टन ऊस गाळप केले असून त्यातून १०९ लाख क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे.