पावणेचार कोटींचा चुराडा, तरीही स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 02:03 AM2018-12-05T02:03:23+5:302018-12-05T02:03:25+5:30
शहरातील स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रशासन दर वर्षी तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करते;
पुणे : शहरातील स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रशासन दर वर्षी तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करते; परंतु आजही शहरातील बहुतेक सर्वच सार्वजनिक स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली असून, दारे-खिडक्या तुटलेल्या, तर पाण्याची सुविधा नाही, प्लॅस्टिक, दारूच्या बाटल्यांमुळे टॉयलेट तुंबलेले, स्वच्छताच होत नसल्याने अतिशय दुर्गंधी अशी विदारक परिस्थिती असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये समोर आले.
स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली असून, यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे स्वच्छतागृह पाडून टाकण्यात यावीत, अशी मागणी खुद्द नगरसेवकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’च्या वतीने शहरातील कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, खिलारे वाडी डेक्कन परिसर, सेनापती बापट रोड, टिळक रोड, पुलाची वाडी, महापालिका मुख्य इमारत परिसर आदी भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छतागृहांची विदारक वस्तुस्थिती समोर आली.
> येथे केली पाहणी
पुलाची वाडी येथे असलेल्या स्वच्छतागृहातील शौचालयामध्ये दारूच्या बाटल्या गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकच्या पिशव्या पडल्याने नागरिकांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यास अडचण होत आहे. पुणे महानगरपालिका बिल्डिंगशेजारी शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा वापर करण्यास त्रास होत आहे.
शिवाजीनगर गावठाण येथील स्वच्छतागृहातील नळाची दुरवस्था झाल्याने पाण्याचे डबके साचले असून, डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे व नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलशेजारी स्वच्छतागृहाच्या बाहेर घाणीचे साम्राज्य साठले आहे. या स्वच्छतागृहातील पाणी हे उघड्यावर जाळीत येत आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे व नागरिक धोका पत्करून या स्वच्छतागृहाचा वापर करीत आहे.
कर्वे रस्ता (अभिनव चौक ते डेक्कन कॉर्नर) एकच मुतारी, पण तिचीही अवस्था खराब, खिलारे रोडवरील तीन स्वच्छतागृहांपैकी दोन यांना कुलूप, खिलारे रोडवर केवळ टॉयलेट, मुतारी नाही. अनेक ठिकाणी दरवाजे व्यवस्थित
नाही.
रानडे इन्स्टिट्यूटशेजारील इलेक्ट्रिक स्वछतागृह बंद, नेहमी पाण्याचा किंवा पॉवरचा अभाव, येथील मुतारीची दुरवस्था, सगळीकडेच पाण्याच्या कमतरतेमुळे
दुर्गंधीचे प्रमाण जास्त, डेक्कन जिमखाना बसथांब्याजवळील स्वच्छतागृहाच्या वापरासाठी ५ रुपये शुल्क आकारले जाते; पण तरीही तेथील नळ व्यवस्थित नाहीत, खिडक्यांना संरक्षक जाळ्या नाहीत. चतुशृृंगी मंदिराजवळील स्वच्छता गृह, स्नानगृहाची अत्यंत दयनीय अवस्था, थुंकल्यामुळे सगळीकडे गलिच्छपणा अतिशय दुर्गंधी.
काकासाहेब गाडगीळ पुलाजवळील शौचालय अनेक दिवसांपासून बंद आहे. परिसरातील लोकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. काही ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक टॉयलेट बंद.
स्वच्छ सर्वेक्षण कागदावरच
सध्या शहरात केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करण्याचे काम ाुरू आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर दंड करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करीत आहे. महापालिका प्रशासनाची जबाबदारी असलेल्या स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली असताना, अतिशय गलिच्छ, दुर्गंधीयुक्त स्थिती असताना याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या तरी महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण कागदावरच असल्याचे दिसते.
आधुनिक मशिनद्वारे केली जाते स्वच्छता
शहरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी लाखो रुपये खर्च करून एक अत्याधुनिक ‘जेटिंग मशिन’ खरेदी करण्यात आली आहे. या मशिनद्वारे दिवसातून दोनवेळा शहरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येते.
- ज्ञानेश्वर मोळक,
घनकचरा विभागप्रमुख