सिटी स्कॅन म्हणजे शरीर तपासणी यंत्र; घाबरण्याचे काहीच कारण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:54+5:302021-04-20T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एरवी वैद्यकीय शब्दकोशात बंद असलेले सिटी स्कॅन, एचसीटीआर टेस्ट, फुप्फुसाला संसर्ग असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एरवी वैद्यकीय शब्दकोशात बंद असलेले सिटी स्कॅन, एचसीटीआर टेस्ट, फुप्फुसाला संसर्ग असे अनेक शब्द कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भीती घालू लागले आहेत. पण यात काळजीचे कारण नाही, कारण उपचार ठरवण्यासाठी अनेक तपासण्या गरजेच्या असतात, त्याचीच ही नावे आहेत असे ‘लोकमत’शी बोलताना वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
या तपासण्या का आवश्यक असतात, कधी करतात, त्यावरून काय निर्णय घेतले जातात याचीही माहिती देत या तज्ज्ञांंनी रूग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. कोरोना रुग्ण वाढत चालले असताना याची किमान प्राथमिक माहिती सर्वांनीच करून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
* सिटी स्कॅन म्हणजे छातीच्या भागाचा विशेष एक्स रे. ह्रदयामागे लपलेल्या लहानलहान गोष्टीही यात स्पष्ट दिसतात. फुप्फुसाचा संसर्ग लगेच लक्षात येतो.
* प्रत्येक रुग्णाला सिटी स्कॅन करण्याची गरज नसते, रुग्णामध्ये कोणती लक्षणे आहेत, त्याला किती दिवस झाले यावर निर्णय घेतात
* किमान ४ ते कमाल ६ दिवस ताप उतरत नसेल, रुग्णाचे शरीर गोळ्या औषधांना प्रतिसाद देत नसेल, वय ६० च्या पुढे असेल, मधुमेह किंवा अन्य व्याधी जास्त प्रमाणात असतील तर सिटी स्कॅन करायला सांगतात.
* कोरोनासाठी एचआरसीटी स्कॅन करायला सांगतात. यात फुप्फुसाला किती संसर्ग झाला आहे हे जास्त चांगले समजते. त्यात वेगळे किंवा गंभीर असे काहीही नाही.
* फुप्फुसाला झालेला संसर्ग २५ पर्यंत मोजतात. त्याला स्कोअर म्हणतात. तो ८ च्या आत असेल तर विशेष नाही, त्यापुढे म्हणजे १४ पर्यंत सुधारणा करता येते, १५ ते पुढे असेल तर विशेष उपचारांची गरज असते.
* सिटी स्कॅन करताना ब्लड टेस्ट करायला सांगतात. त्याचे सीआरपी एलडीपी असे प्रकार आहेत. औषधांंना शरीर किती प्रमाणात साथ देते आहे ते या टेस्टवरून लक्षात येते.
डॉ. पराग खटावकर,
सिनिअर कन्सलटंट, चेस्ट डिसीज
के.ई.एम. रुग्णालय.
----//
* निदान करण्यासाठी सिटी स्कॅन करावे लागत नाही. पण अनेकदा निदान उशीरा होते. रूग्णाला धाप लागते. बोलतानाही तो धापा टाकतो. अशा वेळी सिटी स्कँन करावेच लागते.
* आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली, तरी रूग्णाला लक्षणे जास्त दिसत असतात. त्यावेळी मात्र निदान करण्यासाठी सिटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला जातो.
* फुप्फुसाला किती प्रमाणात संसर्ग झाला आहे, हे उपचार करताना समजणे गरजेचे आहे. सिटी स्कॅनमधून ते समजते.
* सध्या रूग्ण किंवा नातेवाईक स्वतःच सिटी स्कॅन करूनच येतात किंवा डॉक्टरकडे त्याचा आग्रह धरतात, असा माझा तरी अनुभव आहे. गरज नसताना स्कॅनिंग केले, तर खऱ्या गरजवंतांना उगीचच वाट पाहावी लागते. त्यांची अवस्था अधिक बिकट होते.
* कोरोनामध्ये रक्तात गुठळी होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय कोरोनाच्या विविध टेस्ट आहेत. त्यामुळे रक्त तपासणी आवश्यक ठरते. डॉक्टरांनी तसे सुचवल्यावर उगीचच काहीही करायला सांगतात, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.
डॉ. राजलक्ष्मी देवकर
रेडिओलॉजिस्ट, निदानतज्ज्ञ
-----//
* कोरोनामध्ये न्यूमोनिया होतो. तो किती झाला आहे याची बारकाईने तपासणी करावी लागते. सिटी स्कॅन अशी तपासणी करते. प्रत्येक पॅच यात स्पष्ट दिसतो व रुग्णाच्या आजाराचे प्रमाण कळून उपचार करता येतात.
* कोरोना झाला आहे, अशी शंका आल्यानंतर लक्षणे काय आहेत, त्यावर सिटी स्कॅन करायचे की नाही हे ठरते. डॉक्टर तसे सांगतात. ही तपासणी असल्यामुळे आता काही गंभीर झाले आहे, असे समजण्याचे कारण नाही. डॉक्टर गरजेनुसार काय करायचे ते सांगतात.
* सिटी स्कॅनमध्ये फुप्फुसाचा संसर्ग स्कोअर किती आहे ते कळते. हा स्कोअर बरेचदा फसवाही असतो. ५ स्कोअर असलेला रुग्णाला त्रास होतो, पण स्कोअर कमी म्हणून त्याला उपचाराची गरज नाही, असे समजून चालत नाही व १४- १५ स्कोअर असलेला रुग्ण व्यवस्थित दिसतो म्हणून त्याला लगेच जास्तीचे उपचार करावेत असेही नाही. हे डॉक्टरांना ठरवू द्यावे.
* सिटी स्कॅन करताना काही विशिष्ट गोष्टी केल्या जातात. त्याचा रक्तावर काही परिणाम झाला आहे का पाहावे लागते. कोरोनात फुप्फुसाच्या आसपास किंवा इतरत्रही रक्त गोठण्याची प्रक्रिया व्हायची शक्यता असते. रक्तचाचणी केली की हे वेळेवर समजते व उपचार करता येतात. म्हणून रक्तचाचणी करायला सांगतात.
डॉ. नितीन अभ्यंकर-फुफ्फुसरोगतज्ज्ञ. विभागप्रमुख, पूना हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर.
----//