पुणे महापालिकेच्या असंवेदनशीलतेचा कळस; रुग्णवाहिकेअभावी तब्बल दहा तास मृतदेह घरातच पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 11:54 AM2020-08-20T11:54:20+5:302020-08-20T11:55:13+5:30
प्रशासनाच्या उदासिनतेपुढे नातेवाईकांची हतबलता
पुणे : एकीकडे शेकडो कोटींची उधळपट्टी सुरु असताना महापालिका सर्वसामान्य नागरिकांना रुग्णवाहिका पुरवू शकत नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे घरातच मृत्यू झालेल्या ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह केवळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तब्बल दहा तास घरातच पडून होता. पालिकेच्या उदासिन आणि असंवेदनशील कारभारापुढे या ज्येष्ठाचे कुटुंबियही हतबल झाल्याचे बुधवारी पाहायला मिळाले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव धायरी येथील एका सोसायटीमध्ये राहणा-या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. मंगळवारी या ज्येष्ठाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांची तपासणी केल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी डॉक्टर त्यांच्याकडे बुधवारी दुपारी येणार होते. तसेच, घरातील अन्य सदस्य बुधवारी सकाळीच कोरोनाची चाचणी करुन घेण्याकरिता गेलेले होते. या ज्येष्ठाची पत्नी आणि ते स्वत: घरामध्ये होते. दुपारी डॉक्टर आल्यानंतर त्यांनी तपासणी केली असता ही ज्येष्ठ व्यक्ती मृतावस्थेत आढळली.
दरम्यान, चाचणी करुन घरी परतलेल्या कुटुंबियांना हा प्रकार समजताच धक्का बसला. त्यांनी तात्काळ स्थानिक क्षेत्रीय कार्यालय आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधत माहिती दिली. पालिकेच्या कर्मचा-यांनी घरी जाऊन पाहणी केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होताच मृतदेह घेऊन जाऊ असे सांगितले. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही कोणी येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांकडून आरोग्य विभागासोबत संपर्क साधत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यास सांगितले. परंतू, रात्री नऊ वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध झालेली नव्हती. तसेच आणखी तीन ते चार चासांनी रुग्णवाहिका उपलब्ध होईल असे सांगण्यात येत होते. या सर्व प्रकारामुळे कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून आपली हतबलता त्यांना व्यक्तही करता येत नाही अशी परिस्थिती आहे.
======
केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत अंत्यविधी करणे बंधनकारक आहे. परंतू, दहा तासांपेक्षा अधिक काळ हा मृतदेह घरातच पडून होता. त्यामुळे नातेवाईकांसह सोसायटीत भितीचे वातावरण होते.