लोणी काळभोरमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 07:07 PM2021-06-03T19:07:55+5:302021-06-03T19:08:01+5:30
पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई, कदमवस्ती परिसरात निर्माण केली होती दहशत
लोणी काळभोर: पाच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलीसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. याप्ररकणी ऋषीकेश सुरेश पवार ( वय २३, रा. कदमवस्ती, लोणी काळभोर, ) याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात या प्रकरणी महेश मारुती शिरसट ( वय. २९, कदमवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ मेला रात्री ८ वाजता फिर्यादीचे वडील मारुती पवार हे त्यांच्या दुचाकीवरुन घरी येत होते. त्यावेळी ऋषिकेश पवार हा मित्रांसोबत त्यांच्या दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभ्या करुन गप्पा मारत होते. पवार यांना गाडी चालवण्यास अडथळा निर्माण झाल्याने त्यांनी ऋषिकेशला गाडी बाजुला घेण्यास सांगितले होते. तेव्हा त्याने तू मला गाडी बाजुला घ्यायला सांगतो काय? दाखवतोच तुला मी काय आहे अशी धमकी दिली होती. त्यावेळी किरकोळ वाद झाला परंतु त्याची गावात दहशत असल्यामुळे त्याच्या विरुध्द पोलिसात तक्रार केली नव्हती.
त्यानंतर १४ मे रोजी रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारांस महेश शिरसट हे वडील, बहिण, पत्नीसमवेत घराबाहेर ओट्यावर बसले होते. तेव्हा ऋषिकेश हा त्याचा मित्र अक्षय ओव्हाळ याच्यासोबत आला. महेशला घराबाहेर बसलेले पाहुन दोघांनी हातातील कोयता व लोखंडी पाईपने हात, पाय व पाठीवर लोखंडी पाईपने तसेच कोयत्याने उलट्या बाजुने त्याला मारहाण केली. त्यावेळी भाऊ सोडवण्यासाठी आला असता त्यालाही ओव्हाळने लाथ मारुन लोखंडी पाईपने मारहाण केली. व पवार यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून गेला. त्यावेळी महेश घाबरुन वाचण्यासाठी ओरडू लागले. परंतू दहशतीमुळे कोणीही वाचवण्यासाठी आले नाही.
नंतर ते त्या दोघांचे तावडीतुन सुटत घराजवळ राहणाऱ्या उमा कचरे यांच्या घरात जाऊन लपले. त्यावेळी ते पाठलाग करत त्या ठिकाणी आले. घराचा दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी कचरे यांवे दरवाजावर लोखंडी पाईप व कोयता मारला. तसेच दगड उचलुन कचरे यांचे दरवाजावर फेकले. शिवीगाळ करुन तु बाहेर ये तुला दाखवतो मी ईथला भाई आहे. माझ्या नादी लागायच नाही अशी धमकी देऊन निघुन गेले. त्याचे दहशतीने आजुबाजुचे परिसरातील सर्व लोकांनी घाबरुन जाऊन आपआपले दरवाजे बंद केले.
१४ मेला गुन्हा दाखल झाल्यापासून ऋषीकेश फरार होता. १ जून रोजी तो कदमवस्ती येथे येणार असल्याची माहिती गोपनीय खब-यांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याचा साथीदार आकाश ओव्हाळ हा अद्याप फरारी आहे. ऋषीकेश पवार याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोड्याची पूर्व तयारी करणे, आर्म ॲक्ट अशा प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत.