सांस्कृतिक राजधानी पुणे भ्रष्टाचारात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 05:02 AM2020-11-23T05:02:05+5:302020-11-23T05:02:46+5:30
१२६ गुन्हे दाखल, १८३ आरोपींचा समावेश
राकेश घानोडे
नागपूर : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे परिक्षेत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यावर्षी भ्रष्टाचाराचे सर्वाधिक १२६ गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये १८३ आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. अशा प्रतिष्ठित क्षेत्रातील ही शोकांतिका आहे.
सदर आकडेवारी १ जानेवारी ते १७ नोव्हेंबर २०२० या काळातील असून, ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत विभागाने राज्यभरात भ्रष्टाचाराच्या ५७९ प्रकरणात कारवाई केली. त्यात सापळ्याच्या ५४८, अपसंपदाच्या १० तर, अन्य भ्रष्टाचाराच्या २१ प्रकरणांचा समावेश आहे. यामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे परिक्षेत्रात सापळ्याच्या १२३ (आरोपी-१७४), अपसंपदाच्या १ (आरोपी-४) तर, अन्य भ्रष्टाचाराच्या २ (आरोपी-५) प्रकरणात कारवाई करण्यात आली.
नाशिक परिक्षेत्र द्वितीय स्थानावर असून, या परिक्षेत्रात सापळा प्रकरणात ८५ (आरोपी-१०७) व अपसंपदा प्रकरणात ३ (आरोपी-६) असे ८८ गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात ११३ आरोपींचा समावेश आहे. याशिवाय सापळा प्रकरणातील ७५ व अन्य भ्रष्टाचारातील ९ प्रकरणे मिळून दाखल ८४ गुन्ह्यांसह अमरावती परिक्षेत्र तृतीय स्थानावर आहे. हे गुन्हे १६९ (सापळा-१०४, अन्य भ्रष्टाचार-६५) आरोपींविरुद्ध दाखल झाले आहेत.