सांस्कृतिक खात्याला स्वतंत्र मंत्री असावा, मातृसंस्थाकडून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 04:02 PM2017-10-10T16:02:00+5:302017-10-10T16:06:08+5:30
पुणे : सांस्कृतिक क्षेत्राबाबत शासनामध्ये कमालीची अनास्था, उदासीनता पहायला मिळते. नाट्य, चित्रपट क्षेत्रातील समस्यांकडे सरकारकडून कायमच दुर्लक्ष केले जाते. सांस्कृतिक मंत्र्याकडे अनेक खात्यांचा भार असल्याने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या क्षेत्रासाठी अद्याप राज्यमंत्री नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सांस्कृतिक खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातील मातृसंस्थाकडून करण्यात आली आहे.
चित्रपट, साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठकीसाठी वेळ द्यावी, या बैठकीला सांस्कृतिक मंत्र्यासह सर्व मुख्य खात्यांचे सचिव उपस्थित असावेत, अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नाट्यनिर्माता महासंघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.