चांगल्या कामाचा सन्मान ही पुण्याची संस्कृती. - गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:19 AM2017-09-16T03:19:05+5:302017-09-16T03:19:30+5:30
यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी झाले. परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, याचे श्रेय पोलीस दलाला आहे. पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन भावना ठेवल्या, त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही पुण्याची संस्कृती आहे.
पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी झाले. परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, याचे श्रेय पोलीस दलाला आहे. पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन भावना ठेवल्या, त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही पुण्याची संस्कृती आहे. सर्व सण-उत्सवात सलोख्याचे वातावरण ठेवू आणि विघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार नाही हा संदेश देवूया, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेशोत्सवात बंदोबस्त करुन सहकार्य करणाºया पोलीस दलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन विश्रामबाग फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, माजी आमदार मोहन जोशी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, हेमंत रासने, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
शुक्ला यांच्यासह सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बाविस्कर आदींना सन्मानित करण्यात आले. तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांसह जय गणेश व्यासपीठातील गणेशोत्सव मंडळांच्या विश्वस्त आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
पहिल्यांदा पोलिसांचा सन्मान गणेशोत्सव मंडळाकडून झाल्याबद्दल आनंद वाटतो. जोपर्यंत आपण उत्सवात सूचनांचे पालन करणार नाही, तोपर्यंत अनुशासित उत्सव होणार नाही. पोलिसांवर मोठा ताण पडतो. पोलिसांनादेखील वाटते की गणपतीच्या दर्शनासाठी कुटुंबासह जावे. मात्र, त्यांना १४ ते १८ तास ड्युटी करावी लागते. त्यामुळे पोलिसांविषयी प्रत्येकाने माणुसकी दाखवली पाहिजे.
- रश्मी शुक्ला
गणेशोत्सवात गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. छोट्या-मोठ्या चोºया रोखणे हेदेखील आव्हान होते. अनेक सामाजिक संस्थांची पोलिसांना उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. परंतु तरीही आपली व्यवस्था कमी पडली, हे खरे आहे. यापूर्वीच्या अनुभवावरुन नियोजन करणे गरजेचे असून, त्याकरिता अभ्यास सुरु आहे. यंदा देखील विसर्जन मिरवणुकीतील पथकांची संख्या मर्यादित राहिली नाही, पथकातील सदस्यांची संख्या ३० न राहता अगदी १००पर्यंत गेली. यामध्ये बदल केला तर मिरवणूक सकाळी ६ पर्यंत संपू शकेल.
- रवींद्र सेनगावकर
दरवर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक लांबत जाते. प्रत्यक्षात सूर्योदयापूर्वी ही मिरवणूक संपायला हवी. गणेशोत्सवात अनेक चुकीच्या परंपरा येत आहेत. त्यामध्ये हा उत्सव डॉल्बीमुक्त व्हायला हवा. तसेच पुढील वर्षी दहा दिवसांचा उत्सव ड्राय डे असायला हवा.
- अशोक गोडसे