...तर पुण्याची संस्कृती संवादी होईल - श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:13 AM2018-04-06T02:13:21+5:302018-04-06T02:13:21+5:30

पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे.

 ... culture of Pune will be interactive - Shripal Sabnis | ...तर पुण्याची संस्कृती संवादी होईल - श्रीपाल सबनीस

...तर पुण्याची संस्कृती संवादी होईल - श्रीपाल सबनीस

Next

पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे. बहुजन आणि अभिजन कलेला समान स्थान मिळते. शास्त्रीय गायन, शाहिरी, पोवाडा, लोकसंगीत अशा सर्व सांस्कृतिक प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी परंपरा पुण्याने जपली आहे. शेतकरी, कामगार, समाजवादी, कलावंत, आंबेडकरी चळवळीचे, विविध राजकीय संस्कृतीचे नेते, विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना आणि कार्यकर्त्यांची पुणे ही कर्मभूमी आहे. मानवतावाद, सेवाभाव, राष्ट्रवाद अशा प्रकारे पुण्याची संस्कृती सर्व टोकांच्या विचारांना पेलणारी आहे.
पुण्याला साहित्याची समृद्ध आणि प्राचीन परंपरा लाभली आहे. बहुजन, अभिजन, दलित, ग्रामीण, आदिवासी, मुुस्लिम अशा सर्व साहित्य प्रवाहांनी पुण्याच्या साहित्य चळवळीमध्ये मोलाची भर घातली आहे. अनेक साहित्यिकांनी, लेखकांनी, विचारवंतांनी हा साहित्याचा वारसा पुण्यात पेरला, रुजवला आणि जोपासला. समृद्ध साहित्याचा वारसा लाभलेल्या या शहारत मी जाती-धर्माच्या पलीकडची धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन पुण्यात आलो आणि रमलो. लेखक, समीक्षक, साहित्य संमेलनाध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून प्रवास करत असताना पुरोगामी चळवळीतील बहुसंख्य प्रवाहांनी माझी भूमिका समजून आणि पचवून घेतली. मात्र, टोकाच्या उजव्या प्रवाहात या भूमिकेचे पडसाद फारसे उमटलेले दिसले नाहीत.
साहित्य चळवळीतील माझी भूमिका संवाद आणि समन्वयाची आहे. कोणतीही विचारधारा माझी शत्रू नाही. मात्र, मी मतभेदांचे स्वातंत्र्य देतो आणि घेतो. भारतीय लोकशाहीची संकल्पना परस्परांचे स्वातंत्र्य जपणारी, बंधुत्वावर आधारलेली आहे. बंधुत्वाशिवाय समतेचा विचार होऊच शकत नाही. बंधुत्व हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. माझाही बंधुभावनेवर जास्त भर देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, पुण्याच्या संस्कृतीमध्ये बंधुत्व काहीसे उपेक्षित राहिले आहे, असे वाटते. पुण्याची संस्कृती सर्वसमावेशक करायची असेल तर परस्परविरोधी संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाचे जाहीर कार्यक्रम व्हायला हवे. पटलेल्या मुद्द्यावर संवाद आणि उरलेल्या मुद्द्यांवर संघर्ष, त्यातून समन्वयाकडे वाटचाल ही भूमिका पुणेकरांनी स्वीकारण्याची गरज आहे.
साहित्यिक विविध चळवळी, प्रवाहांमध्ये विभागले गेले आहेत. सर्व साहित्य प्रवाहात माणूस हा समान धागा असला पाहिजे. परस्परांचे प्रश्न आणि दु:ख साहित्यातून समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. साहित्य चळवळ सर्वव्यापी, सर्वसमावेशक करताना विद्रोही आणि प्रस्थापित साहित्यातील भेदरेषा संपली पाहिजे. संवाद निर्माण होऊन हा ह्य
भेद संपुष्टात यावा, यासाठी साहित्यिकांनी
आणि पुण्यातील साहित्यिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लेखक, कवी, कलावंतांनी स्वत:मध्ये निर्माण केलेल्या गटातटाच्या
भिंती पाडाव्यात. साहित्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी असला पाहिजे. सर्वार्थाचे कल्याण
हा साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारणाचा ध्येयवाद असायला हवा. व्यक्तिवाद, जातीवाद, वंशवाद, धर्मवाद हे सर्व संकुचित वाद बाजूला
करून संवादाची भूमिका स्वीकारल्यास सांस्कृतिक संचित जपले जाईल.

Web Title:  ... culture of Pune will be interactive - Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.