संस्कृती जीवनासह विचारात असावी
By admin | Published: January 9, 2017 03:34 AM2017-01-09T03:34:36+5:302017-01-09T03:34:53+5:30
देशाच्या बाहेर गेल्यानंतर आपली संस्कृती काय आहे, याची जाणीव होते. पाश्चात्त्य गोष्टी आपण खूप पाहतो, त्याचे अनुकरणही करतो आणि
पुणे : देशाच्या बाहेर गेल्यानंतर आपली संस्कृती काय आहे, याची जाणीव होते. पाश्चात्त्य गोष्टी आपण खूप पाहतो, त्याचे अनुकरणही करतो आणि आपण पुरोगामी आहोत, असे म्हणतो. संस्कृतीतून जगण्याची प्रेरणा मिळत असेल तर ती आत्मसात करायला काय हरकत आहे? अशा शब्दांत ज्येष्ठ वास्तूविशारद बाळकृष्ण दोशी यांनी पुरोगाम्यांवर टीका केली. जीवन व्यवहारातच नव्हे, तर संस्कृती ही विचारातही असली पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘आम्ही नूमविय’च्या रविवारी झालेल्या महामेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते दोशी यांना ‘नूमविरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संरक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक डॉ. अजय लेले, खो-खो प्रशिक्षक श्रीरंग इनामदार, ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे डॉ. मधुसूदन झंवर यांना ‘नूमवियभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, आम्ही नूमवियचे अध्यक्ष अजित रावेतकर, सचिव मिलिंद शालगर, नूमवि शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी उमासे आदी उपस्थित होते.
हा पुरस्कार माझ्या कल्पनेतही नव्हता. आयुष्यात ज्या गावात आपण कधी काळी राहतो? तिथे परत अशा माध्यमातून यायला मिळेल, असे कधीच वाटले नाही. पण या पुरस्कारासाठी आम्ही नूमवियचा फोन आला आणि ‘चला घरी परत जाऊया, हे माझे घर आहे,’ अशी भावना दोशी यांनी व्यक्त केली.
मर्मबंधात ठेवावा असा हा सृजनात्मक सोहळा आहे, असे सांगून डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, नूमविच्या स्मरणरंजनातून नात्याचे संस्थाकरण होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र आगामी काळात शालेय शिक्षणाची नव्याने फेरमांडणी करण्याची गरज आहे. घिशापिट्या शिक्षणातून नव्या पिढीला बाहेर काढले पाहिजे.
राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)