लोककलांमधून उलगडली संस्कृती
By admin | Published: May 5, 2017 02:32 AM2017-05-05T02:32:06+5:302017-05-05T02:32:06+5:30
गर्जा महाराष्ट्र माझा, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, अरे कृष्णा, अरे कान्हा, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी सारख्या
पिंपरी : गर्जा महाराष्ट्र माझा, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, अरे कृष्णा, अरे कान्हा, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी सारख्या अजरामर गीते आणि लोककलांचा वारसा जपणाऱ्या नयनरम्य नृत्यरचनांच्या सादरीकरणाने महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा रसिकांसमोर उलगडला.
सांस्कृतिक कला अकादमी ट्रस्ट, पुणेतर्फे ‘संस्कृती महाराष्ट्राची ; वैभवशाली परंपरेची’हा गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा कलाविष्कार चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सादर झाला. संगीतकार कौशल इनामदार, सिनेकलाकार पार्थ भालेराव, माजी महापौर अपर्णा डोके, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव, सामाजिक कार्यकर्ते आनंद कुदळे, नीता गुरव, धनश्री कुलकर्णी, चंद्रकांत निगडे, शरद महाबळ, विश्वनाथ भालेराव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा या बहारदार गीताने झाली. तर संतांनी आपल्या आराध्याला हाक मारण्याकरिता निवडलेल्या अरे संसार संसार या ओवीच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अगं नाच नाच राधे... ही गवळणी सादर झाली. गवळणी आणि लावण्या यांच्या मेलडीने रंगत आणली. शाहिरी परंपरेतील श्रीकांत रेणके यांनी शिवरायांचे गुणगान पोवाड्यातून सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले तांबडी माती या चित्रपटातील जीवा शिवाची बैलं जोडं... या गीताने रंगत आणली. जैत रे जैत चित्रपटातील आम्ही ठाकर ठाकर या गीताने महाराष्ट्रातील विविधतेची ओळख रसिकांना करून दिली. (प्रतिनिधी)
लाभले आम्हास भाग्य : रसिकांचा सहभाग
इनामदार यांनी लाभले आम्हास भाग्य... हे मराठी अभिमान गीत सादर करताच रसिकांनी त्यांना साथ देत आपला सहभाग नोंदविला. इनामदार म्हणाले, संस्कृती टिकविण्याचे वाहन भाषा हे आहे. त्यामुळे मराठी भाषा वाढविणे, हा संस्कृती टिकविण्याचा उत्तम उपाय असून, प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. कार्यक्रमात नाट्यगीते आणि अजय-अतुल सारख्या आघाडीच्या गायकांची गीतेही सादर झाली. धनश्री कुलकर्णी, नीता गुरव, भाग्यश्री गोसावी, अविनाथ मातापूरकर, चंद्रकांत निगडे, अभिजित वाडेकर (गायन), दिलीप व्यास, राजेंद्र साळुंके (तालवाद्य), आकाश जाधव, श्रीकांत पत्की (सिंथेसायझर), महेश जोजारे (आॅक्टोपॅड), सिद्धी कोळवणकर आणि सहकलाकार यांनी नृत्य सादरीकरण केले. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन सादर केले.