संस्कृती, परंपरेची चिकित्सा व्हावी

By Admin | Published: January 11, 2017 02:46 AM2017-01-11T02:46:18+5:302017-01-11T02:46:18+5:30

आजचा राष्ट्रवाद हा नेत्यांमधील दुफळी निर्माण करणारा आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली राष्ट्रीय नेत्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यास राष्ट्रवादाचा तडका देणे

Culture, tradition should be treated | संस्कृती, परंपरेची चिकित्सा व्हावी

संस्कृती, परंपरेची चिकित्सा व्हावी

googlenewsNext

पिंपरी : आजचा राष्ट्रवाद हा नेत्यांमधील दुफळी निर्माण करणारा आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली राष्ट्रीय नेत्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यास राष्ट्रवादाचा तडका देणे, ही बाब चुकीची आहे, विकृत आहे. राष्ट्रवादाचा बागुलबुवा निर्माण करून लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांची चिकित्सा व्हायला हवी. ती अहिंसक असावी. राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेमाच्या व्याख्या ठरायला हव्यात, अशी परखड टीका ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
रोटरी क्लब, चिंचवड, पुणे यांच्या वतीने चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील शिशिर व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर होते. व्यासपीठावर रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख, अध्यक्ष अरविंद गोडसे, प्रकल्प संचालिका प्राध्यापिका शिल्पागौरी गणपुले, सचिव मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. या वेळी उद्योजक रमेश सातव व रमण प्रीत यांना व्यवसायनैपुण्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विश्वंभर चौधरी यांनी, ‘राष्ट्रवाद : काल आणि आज’ या विषयावर भाष्य करताना संस्कृतीतून आलेल्या चुकीच्या रुढी, परंपरा, मनुस्मृती, लोकशाहीतील घटनेचे योगदान, नोटाबंदी परिणाम, सोईस्करपणे केल्या जाणाऱ्या राष्ट्रवादाच्या व्याख्या, विज्ञानवादी दृष्टिकोन यावर भाष्य केले. सार्वभौम राष्ट्रासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावरही परखड मते  व्यक्त केली.
फ्लेक्स संस्कृतीवर चौधरी म्हणाले, ‘‘व्हीजन डॉक्युमेंट  या राजकीय वल्गना आणि  आश्वासने आहेत. राजकारण्यांचा फॉरमॅट ठरलेला आहे. आता एक  नवी संस्कृती उदयास येत आहे.  ती म्हणजे फ्लेक्स. एक कोणता  तरी दादा किंवा भाईचा फोटो फ्लेक्सवर असतो. त्याखाली पाच-पन्नास लाचार चेहरे दिसतात, हे चित्र खूप चुकीचे आहे.’’ या विधानावर रसिकांमधून टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.  बाविस्कर म्हणाले, ‘‘रोटरी क्लबने चिंचवडला गेली वीस वर्षे ज्ञानयज्ञ सुरू ठेवलेला आहे, ही
विशेष उल्लेखनीय बाब आहे.  मानवी मूल्यांची जपणूक, राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ही कोणाची मक्तेदारी नाही,
हे आजच्या व्याख्यानातून पुढे  आले. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम  याविषयी बौद्धिक, वैचारिक चिकित्सा व्हायला हवी. मानसिकता बदलून समता रुजविल्यानंतरच राष्ट्रवाद निर्माण होईल.’’
प्रसाद गणपुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. खजिनदार मनोहर दीक्षित यांनी आभार मानले. मधुरा शिवापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांची ओळख माजी अध्यक्ष संजय खानोलकर यांनी केली. जयप्रकाश रांका, प्रसिद्धिप्रमुख राजन लाखे, शुभदा गोडसे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)


बँकेच्या रांगेत उभे करणे हा कसला राष्ट्रवाद

ते म्हणाले, ‘‘भारत महासत्ता बनण्यासंदर्भात भुलभुलैया केला जात आहे. विज्ञानात आपण महासत्ता होऊ, असे वाटत असेल, तर हे मला मृगजळ वाटते. कारण पुण्यात डॉ. दाभोलकरांचा खून होतो. वास्तविक राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेमाचा गैरवापर सुरू आहे. आर्थिक राष्ट्रीयवाद दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यांनी आणला, तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी राजकीय राष्ट्रवाद आणला. आता बँकेच्या रांगेत गुलामासारखे उभे करणे हा राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम म्हणणे चुकीचे. एका आर्थिक गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर दुसरी आर्थिक गुलामगिरी स्वीकारणे ही धोक्याची घंटा आहे. व्यक्तिस्वातंत्र्याला बाधक आहे. जन्माने माणसाला राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम मिळते, ते सांगावे लागत नाही. ते अवनत पातळीवर नसावे. भारतमाता की जय म्हटले, की राष्ट्रप्रेमी आणि नाही म्हटले, तर राष्ट्रविरोधी हे चुकीचे आहे. कन्हैया चूक की बरोबर हे महत्त्वाचे नसून, त्याने उपस्थित केलेले प्रश्न विचार करायला लावणारे आहेत.’’

शेतकरी संपला
चौधरी म्हणाले, ‘‘असहिष्णूतेची खिल्ली उडवून चालणार नाही. त्यांची दखल घ्यायला हवी. लोकशाहीने डोळे उघडे ठेवून निर्णय घ्यावेत. नोटाबंदीचा निर्णय झाला. त्या वेळी गरिबांना वाटले, श्रीमंत संपला. श्रीमंतांना वाटले, काळी माया जमविणारे राजकारणी, अधिकारी संपले. संपले मात्र कोणीच नाही. संपला तो शेतकरी.’’ व्याख्यानाचा शेवट करताना ‘समर शेष है...’ ही कविता सादर करताना ‘जो चूप रहे उस का है अपराध...’ हा संदेश चौधरींनी आपल्या मनोगतातून दिला.

Web Title: Culture, tradition should be treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.