शहरात सायंकाळी ५ नंतर संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:12+5:302021-06-29T04:09:12+5:30
पुणे : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी ५ ...
पुणे : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कामे संपवून सायंकाळी ५ वाजण्याच्या आत घरी परतावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार वाढू नये म्हणून राज्यात पुन्हा कडक नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेलदेखील ४ वाजेनंतर बंद राहतील. त्यानंतरचा एक तास हा नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी देण्यात आला आहे.
शहरात सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांना फक्त अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडण्यास परवानगी राहणार आहे. नागरिकांनी सायंकाळी पाचनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस सहआयुक्तांनी केले आहे. विनाकारण बाहेर पडल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.