Maharashtra lockdown: पुण्यात संचारबंदी फक्त कागदावरच! प्रमुख चौकात गर्दीचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 11:41 AM2021-04-15T11:41:11+5:302021-04-15T11:54:59+5:30
चौकांमध्ये बॅरिकेड्स, पण पोलीस नाहीत
पुणे: राज्यात कोरोनाचा विळखा अत्यंत घट्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. परंतु राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्यात संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र दिसून आले आहे.
काल रात्री ८ नंतर संचारबंदीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने आज पहिल्या दिवशी पुण्यातील प्रमुख रस्ते आणि चौक यांची पाहणी केली. अत्यंत खेदजनक चित्र पाहणीतून दिसून आले आहे. कालच देशात कोरोना रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर हजाराहूनही अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात महाराष्ट्रात रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. तर पूर्ण देशात येणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्येत पुणे २ नंबरवर आहे. तरीही पुण्यातील नागरिक काही ना काही कारणाने बाहेर पडत असलेले पहायला मिळाले.शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन, कर्वे रोड लक्ष्मी, महात्मा गांधी रस्ता अशा अनेक रस्त्यांवर सकाळपासूनच गर्दी दिसून आली आहे. बाहेर येणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत का नाही हे ओळखणेही कठीण आहे.
सरकारकडून सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद आहेत. मात्र नागरिक नोकरी आणि काही कामांसाठी बाहेर पडले आहेत असं त्यांनी गाड्यांवर लावलेल्या स्टिकर्स आणि बोर्ड वरुन दिसत होतं.
चौकांमध्ये बॅरिकेड्स पण पोलीस नाही........
शहरातील काही चौक आणि रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पण त्याठिकाणी पोलीस नसल्याचे चित्र दिसून आले आहे. काही ठिकणी पोलीस असूनही नागरिकांना अजिबात थांबवले जात नाहीये.
बॅंकांबाहेर गर्दी
दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बॅंकाबाहेर गर्दी पहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर लोक आत बॅंकेतली आज कामे करुन बाहेर पडलेले दिसले. अनेक बॅंकाबाहेर रांगा लागल्या होत्या.