छत्रपती कारखान्याच्या निकालाबाबत उत्सुकता
By Admin | Published: April 27, 2015 04:49 AM2015-04-27T04:49:02+5:302015-04-27T04:49:02+5:30
भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. ‘बारामती एमआयडीसी’तील वखार महामंडळाच्या
बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. ‘बारामती एमआयडीसी’तील वखार महामंडळाच्या गोदामात ही मोजणी होणार आहे. या मोजणीसाठी एकूण ७६ टेबलांवर ४०० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. सकाळी सात वाजता मोजणी सुरूहोईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, सह निवडणूक अधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता मतपेट्या ठेवलेली स्ट्राँग रूम उघडली जाणार आहे. त्यातून एकाच वेळी सर्व मतपेट्या बाहेर काढल्या जाणार आहेत. ‘ब’ वर्ग प्रतिनिधी गटाचा निकाल सर्वांत अगोदर जाहीर होईल, तर राखीव प्रवर्गापासून मतमोजणी सुरू होइल. राखीव प्रवर्गातील पहिला निकाल सकाळी साडेदहा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. राखीव गटानंतर सर्वसाधारण प्रवर्ग मोजणीसाठी घेतले जाणार आहेत. वेगवान, अचूक मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सध्या केलेल्या नियोजनानुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. मात्र, मतदारांकडून ‘क्रॉसिंग’व्होटचे प्रमाण अधिक झाल्यास काही प्रमाणात वेळ लागेल. प्रत्येक टेबलसाठी ४ कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. बाहेर अफवा पसरविण्यास मोबाईल कारणीभूत ठरतो. हा पाठीमागील दोन कारखान्यांच्या निवडणुकांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी मोबाईल बंदी करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या वेळी मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणीच्या कागदाचा नमुना दिलेला आहे. त्यामुळे मतमोजणी करणारे, पाहणाऱ्या दोघांचा मोजणीचा नमुना एकच राहील.