मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाबाबत उत्सुकता; नागपूर की पुणे, याविषयी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:05 PM2017-12-08T13:05:00+5:302017-12-08T13:10:45+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे : बडोदे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदावर मराठवाड्याचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाचे संमेलनाध्यक्षपद नागपूरकडे की पुण्याकडे याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.
निवडणुकीच्या तोफा काहीशा थंडावल्यामुळे उमेदवारही मतांची समीकरणे आणि जुळवाजुळव करण्यात गुंतले असल्याचे चित्रही दिसत आहे. आयोजक संस्थेची मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार संमेलनाध्यक्षपदाचा दावेदार ठरतो, असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. यंदा मात्र या मतपत्रिका एकगठ्ठा पद्धतीने न आल्याने ऐन वेळी ‘गेम चेंजर’ कोण ठरणार, हे पाहणे औैत्सुक्याचे ठरेल.
९१व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होत आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी एकूण १०७० मतदार मतदान करणार असून, गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७७५ मतपत्रिका आल्याची माहिती निवडणूक अधिकारी अॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मराठवाडा साहित्य परिषदेने सुरुवातीपासूनच लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुण्यातील पुरोगामी संघटना, कार्यकर्त्यांनी राजन खान यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे नावही आघाडीवर आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या पाठिंब्यामुळे रवींद्र शोभणे यांचे पारडे जड आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद देशमुख यांच्यासाठी छुप्या पद्धतीने खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे.
संमेलनाध्यक्षपदासाठी मतदान करणाऱ्या मतदारांपैैकी ७० टक्के लोकांचा साहित्याशी दुरान्वये संबंध नसतो. साहित्य संस्थांचे पदाधिकारीही केवळ गटातटाचे राजकारण करण्यात मग्न असतात. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आणि मतदार असा थेट सामना झाला पाहिजे, असे मत एका उमेदवाराने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
एकगठ्ठा मतपत्रिका आलेल्या नाहीत
आयोजक संस्थेकडून यंदा एकगठ्ठा पद्धतीने मतपत्रिका आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मते कोणाच्या पारड्यात पडणार ही बाब गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांनी देशमुख यांना मतदान करावे, यासाठी फोनाफोनी झाल्याची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचतील.