कुतुहलाने खाली वाकला अन पडला १५ फूट गटारात, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 12:51 PM2021-10-02T12:51:28+5:302021-10-02T13:04:04+5:30
चोरट्यांनी रस्त्यावरील मेन होलचे झाकण चोरुन नेले़ अपघात होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यावर बॅरिकेट टाकून ठेवले होते
पुणे : चोरट्यांनी रस्त्यावरील मेन होलचे झाकण चोरुन नेले़ अपघात होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यावर बॅरिकेट टाकून ठेवले होते. असे असताना एकाने कुतुहूल म्हणून बॅरिकेट बाजूला करुन खाली काय आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यात पाय घसरुन तो थेट १५ फुट खोल असलेल्या गटारात पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरुप सुटका केली. हा प्रकार कात्रज चौकात शनिवारी सकाळी ९ वाजता घडला.
विजय बेलभादुर (वय ३९, रा. शनीनगर, आंबेगाव बुद्रुक) असे मेनहोलमध्ये पडलेल्याचे नाव आहे. विजय हा मोलमजुरी करतो. तो मजूरीसाठी जात असताना कात्रज चौकातील बॅरिकेटखाली काय आहे, हे पहात असताना त्याचा पाय घसरला व तो थेट गटारात कोसळला. तेथून जात असलेल्या कुमार कांबळे यांनी त्याचा आवाज ऐकला. तेव्हा गटारात कोणीतरी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले.
सिंहगड रोड अग्निशमन अग्निशमन दल, पोलीस तातडीने तेथे पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने फासागाठ करुन काही मिनिटात बाहेर काढले. सिंहगड अग्निशमन केंद्राचे तांडेल पांडुरंग तांबे, जवान सतीश डाकवे, संजू चव्हाण, संदीप पवार, संतोष चौरे यांनी ही कामगिरी केली.