Pune: शरद पवार काय बोलतात याचे औत्सुक्य; ‘इंडिया फ्रंट’चा राज्यातील पहिलाच मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:17 AM2024-02-24T11:17:23+5:302024-02-24T11:18:38+5:30
यानिमित्ताने बरेच पुणेकर पुण्यातीलच शरद पवार यांच्या एका राजकीय सभेतील ‘कारभारी बदला’ या वक्तव्याचे स्मरण करत आहेत....
पुणे : ‘इंडिया फ्रंट’चा राज्यातील पहिलाच मेळावा शनिवारी (दि. २४) काँग्रेस भवनमध्ये होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने ते काय बोलतात, याबद्दल राजकीय औत्सुक्य तयार झाले आहे. यानिमित्ताने बरेच पुणेकर पुण्यातीलच शरद पवार यांच्या एका राजकीय सभेतील ‘कारभारी बदला’ या वक्तव्याचे स्मरण करत आहेत.
राजकीय सभेमध्ये मोजकेच, पण मार्मिक बोलण्यासाठी शरद पवार प्रसिद्ध आहेत. २००७ मध्ये महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. सगळ्या रस्त्यांवर खड्डे झाले होते. कलमाडी यांचे महापालिकेवर वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात होती. त्यावेळी पके हौदावर झालेल्या एका सभेत पुण्याचे त्यावेळचे सर्वेसर्वा असलेले सुरेश कलमाडी यांना अनुषंगून पवार यांनी ‘पुण्याचा कारभारी बदला’ हे वक्तव्य केले होते. ते त्यावेळी फार गाजले होते.
त्यामुळेच ‘इंडिया फ्रंट’च्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहणारे पवार शनिवारी काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘इंडिया फ्रंट’ देशस्तरावर स्थापन झाली आहे. त्यात ४८ पक्ष व संघटना आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) हे प्रमुख व अन्यही बरेच पक्ष आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटलेली आघाडी असे स्वरूप आता महाविकास आघाडीला आले आहे. त्यांचा काँग्रेसभवनमधील हा मेळावा राज्यातील पहिलाच मेळावा आहे. पवार यांच्याबरोबरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे आदित्य ठाकरे हेही मेळाव्याला उपस्थित असणार आहेत.