वास्तूंना क्रांतिकारकांची नावे देणं कौतुकास्पद : शरद पवार
By Admin | Published: December 26, 2016 03:32 AM2016-12-26T03:32:42+5:302016-12-26T03:32:42+5:30
सार्वजनिक नाट्यगृहे, रंगमंदिर आणि शाळांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची नावे
येरवडा : सार्वजनिक नाट्यगृहे, रंगमंदिर आणि शाळांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची नावे देणे म्हणजे हा या क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान आहे. महाराष्ट्रात पुणे महापालिकेने सर्वप्रथम अशा प्रकारचा पुढाकार घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी काढले.
येरवड्यात महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी आलगुडे, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आमदार शरद रणपिसे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे उपस्थित होते.
पवार म्हणाले, सामान्य परिस्थितीमुळे मर्यादीत शिक्षण घेऊनही मुंबईमध्ये कामगारांचे नेतृत्व करत असताना अण्णाभाऊंनी क्रांतिकारक साहित्याची निर्मिती केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला अण्णाभाऊंनीच सुरुवात केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी जोपर्यंत सामान्यांना पुरेसे अन्न मिळत नाही, तोपर्यंत या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही, असे विचार अण्णाभाऊंनी त्या काळात मांडले. पुण्यात शिक्षण घेत असताना आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्यासारख्या विचारवंतांची भाषणे व विचार शनिवारवाड्यावर ऐकायला मिळाले.’’ मुंबईवर लावण्या रचन्याबाबत पठ्ठे बापुरावांबरोबरच अण्णाभाऊंचे नाव घ्यावे लागेल, असे सांगत पवार यांनी अण्णाभाऊंनी मुंबईवर रचलेली एक लावणीही वाचून दाखवली. नगरसेविका मीनल सरवदे यांनी प्रास्ताविक केले. मीनल सरवदे व आनंद सरवदे यांनी पवार यांचा सत्कार केला.