उत्सुकतेने सर्वांच्या नजरा बिबट्या शोधत होत्या.. पण त्याने शेवटी ‘कल्टी’च मारली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:05 PM2019-01-31T18:05:38+5:302019-01-31T18:11:11+5:30
एनडीएच्या हद्दीत गुरुवारी सकाळ पासून बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली.
वारजे माळवाडी: एनडीएच्या हद्दीत गुरुवारी सकाळ पासून बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली. वन विभाग, एनडीए प्रशासन व तसेच वारजे व उत्तमनगर पोलिसांनी बराच वेळ शोध घेतला.. तसेच बिबट्याला पाहण्यासाठी न दिसल्याने शेवटी बिबट्या दिसला ही अफवाच असल्याचे सिध्द झाले आहे.
याबाबत पोलीस व वन प्रशासनातर्फे दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. दुपारी बाराच्या सुमारास वारज्यातून शिवणेकडे पायी जाणाऱ्या व्यक्तीस एनडीएच्या सीमाभिंतीजवळ बिबट्या नजरेस पडला. त्याने आरडा ओरड केल्यावर हा बिबट्या आतमध्ये दाट झाडीत पळून गेला आहे. दुसरी शक्यता वारज्यातील मुंबई- बंगळुरू महामार्गाजवळ डुक्कर खिंड भागात देवयानी इमारत आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेस सकाळी बिबट्या दिसल्याची देखील चर्चा रंगली होती. सदर महिलेने माहिती कळवण्याच्या वृत्तास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी वृत्तास दुजोरा दिला. पण त्या महिलेशी संपर्क होत नसल्याचेही त्यांनी मान्य केले.
दरम्यान वन विभागाचे कात्रज येथील एक टीमने एनडीए हद्दीत आतपर्यंत जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बिबट्यासारखा अत्यंत चपळ असलेला प्राणी एनडीएच्या विस्तीर्ण अशा जंगलात कच्च्या रस्त्याने एका वाहनात बसून शोधणे व सापडणे अवघड आहे.
......................
नागरिकांची करमणूक - येथील गणपती माथा परिसरात दुपारी बारा वाजल्या पासून तीन वाजेपर्यंत नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. येणारे जाणारे प्रत्येक जण काय झाले? याची चौकशी करून आपली वाहने बाजूला उभे करुन सीमा भिंतीजवळ येत आतमध्ये बिबट्याचा शोध घेत होते.
..............
दुपारी साडे बाराच्या सुमारास कोणी भगत नावच्या व्यक्तीने नियंत्रण कक्षाला बिबट्या दिसल्याची माहिती दिली होती. त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने आपण स्वत: बिबट्या पाहिला नाही पण मोठी गर्दी झाल्याने व त्याचे कारण समजल्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण नियंत्रण कक्षाला माहिती कळवल्याचे त्याने सांगितले. प्रकाश खांडेकर - पोलिस निरीक्षक गुन्हे,वारजे