सध्याचा नृत्यप्रकार म्हणजे अंगविक्षेप
By admin | Published: October 11, 2016 02:07 AM2016-10-11T02:07:49+5:302016-10-11T02:07:49+5:30
नृत्यकलेची जोपासना करणारा कलाकार संपूर्ण अस्तित्वातूनच व्यक्त होत असतो. हे या नृत्यकलेचे सामर्थ्य आहे. कलाकार अत्यंत
पुणे : नृत्यकलेची जोपासना करणारा कलाकार संपूर्ण अस्तित्वातूनच व्यक्त होत असतो. हे या नृत्यकलेचे सामर्थ्य आहे. कलाकार अत्यंत परिश्रमपूर्वक हे सामर्थ्य साध्य करत असतात. त्यात साधना आणि शास्त्रीय बैठक अपेक्षित असते. मात्र, आजकाल नृत्याच्या नावाखाली अनेकदा निव्वळ अंगविक्षेप पाहायला मिळतात’, अशा शब्दांत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी सध्याच्या नृत्यशैलीबाबत खंत व्यक्त केली.
पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार त्यांच्या शिष्या व कथक नृत्यगुरू रोशन दात्ये यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. या वेळी तेंडुलकर बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, नृत्यांगना शमा भाटे, सुचेता भिडे-चापेकर, समीक्षक माधव वझे, माधुरी सहस्रबुद्धे उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, ‘आजची नृत्यशैली फार विक्षिप्त झाली आहे. विजेचा धक्का बसल्यावर ज्याप्रमाणे अंगविक्षेप होतात, त्याप्रमाणे नर्तकाचे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य पाहायला मिळते. या प्रकाराला ‘नृत्य’ म्हणायचे झाले तरीही त्यात नेमके काय पाहायचे, हे अनेकदा लक्षात येत नाही. कुणालातरी बसलेला शॉकच पाहायचा असेल, तर त्यासाठी खास प्रेक्षागृहात यायची काय गरज’,
अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)