सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा धर्मनिरपेक्ष -आशा पारेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:04 AM2017-09-11T04:04:27+5:302017-09-11T04:04:39+5:30
आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले.
पुणे : आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले. या वेळी ‘द हिट गर्ल’ या त्यांच्या आत्मचरित्राचे सहलेखक खालिद मंहोमद आणि प्रकाशक अजय मागो, संमेलनाच्या प्रणेत्या डॉ. मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते.
आत्मचरित्राविषयी पारेख म्हणाल्या की, मी आजवर केवळ अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे; मात्र त्या व्यतिरिक्त इतरही खूप काही मी आयुष्यात केले. ते सर्व लोकांसमोर यावे, या हेतूनेच आत्मचरित्र लिहिण्याचे माझ्या मनात आले. एक अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त मी एक चित्रपट वितरण कंपनीदेखील चालविली आहे. सिनेआर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सेन्सॉर बोर्डावर काम केले आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल असे हॉस्पिटलदेखील चालविले आहे. माझ्या आयुष्यातील सर्व पैलू यानिमित्ताने वाचकांसमोर आले आहेत, याचा मला आनंद आहे़
आपल्या आवडीचा सहकलाकार कोणता, या प्रश्नावर त्यांनी शम्मी कपूर असे उत्तर दिले. ते माझ्या पहिल्या चित्रपटाचे हीरो होते आणि त्यांनी माझी कायमच काळजी घेतली. मी त्यांना गंमतीने कायमच चाचा म्हणायचे, ते त्यांनी नेहमीच खेळकर वृत्तीने घेतले. या वेळी दिलीप कुमार यांच्या बरोबर झालेल्या गैरसमजामुळे इतक्या मोठ्या प्रथितयश कलाकारा बरोबर काम करता आले नाही याचे दु:ख मनात कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये गेल्या तीन दिवसांत दिग्गज कलाकार आणि लेखकांनी हजेरी लावली व विविध विषयांवर आपली मते मांडली. यंदा ‘व्हॉइस आॅफ वूमेन’ ही संकल्पना असल्याने या विषयी झालेल्या चर्चा खूप रंगल्या.
पुण्याशी माझे विशेष नाते
पुण्याशी माझे विशेष नाते आहे. माझी आई फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायची, त्यामुळे वडील तिला भेटायला पुण्यात येत. त्यांनी तिला पुण्यातच लग्नासाठी मागणी घातली त्यानंतर १९४० मध्ये त्यांचे लग्न झाले. मी एफटीआयआयमध्ये शिकू शकले नाही, ही सल नेहमीच माझ्या मनात राहील. खरेतर मी असे मानते की, अभिनय हा शिकवता येत नाही, तो अंगभूत असावा लागतो; मात्र एफटीआयआयने आपल्या चित्रपटसृष्टीला खूप चांगले कलाकार आणि तंत्रज्ञ दिले. खरेतर मी एफटीआयआयची स्थापना होण्याआधीच चित्रपटसृष्टीत आले. लहान वयातच मिळालेल्या रंगभूमीच्या अनुभवामुळे चित्रपटसृष्टीत काम करणे मला सोपे झाले.