समाजातील सद्य: स्थिती भयावह : सतीश आळेकर; पुण्यात रंगला तन्वीर सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:11 PM2017-12-11T14:11:38+5:302017-12-11T14:23:47+5:30

रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना शनिवारी ज्येष्ठ नाट्यसमीक्षक पुष्पा भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

The current situation in the society is frightening: Satish Alekar; Tanveer Honor ceremony in Pune | समाजातील सद्य: स्थिती भयावह : सतीश आळेकर; पुण्यात रंगला तन्वीर सन्मान सोहळा

समाजातील सद्य: स्थिती भयावह : सतीश आळेकर; पुण्यात रंगला तन्वीर सन्मान सोहळा

Next
ठळक मुद्देविज्ञान शाखेची पार्श्वभूमी ते ललित कला केंद्राची स्थापना हा प्रवास थक्क करणारा : मुक्ता बर्वेआळेकर यांची कामाची पद्धत, जीवनमूल्यांचा अभ्यास आदी बाबींचा हेवा वाटतो : अरुण खोपकर

पुणे : सध्या नाटकांबद्दल नव्हे तर समाजातील सद्य:स्थितीचे भय वाटण्याजोगी परिस्थिती आहे. बाबरी मशीद पडल्याच्या घटनेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे. ज्यांच्यामुळे कलाकाराला अभिव्यक्त होण्याची भीती वाटते, त्या शक्ती सत्तास्थानी आहेत. कलाकाराला भोवतालची भीती वाटणार नाही, असे सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. राज्यकर्त्यांतून असे घडत नसल्यास कलाकाराने कलेच्या माध्यमातून भयाबद्दल बोलते झाले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीकडे लक्ष वेधले.
रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना शनिवारी ज्येष्ठ नाट्यसमीक्षक पुष्पा भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबईच्या फॅट्स थिएटरच्या फैजे जलाली यांना नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, ज्येष्ठ कलाअभ्यासक अरुण खोपकर व अभिनेत्री मुक्ता बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. 
आळेकर म्हणाले, ‘‘६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पडली तेव्हा कोलकाता येथे ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग सुरू होता. १२ डिसेंबर १९७२ रोजी देशाच्या फाळणीचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना नाटकाचा प्रयोग झाला होता. उदात्तीकरणाच्या काळात नाटकातून अभिव्यक्त होण्याची नितांत गरज असते. कलाकाराने आपल्या माध्यमातून व्यक्त होऊन भोवतालच्या परिस्थितीबाबत आणि भयाबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे.’’  डॉ. श्रीराम लागू यांच्या रूपाने अभिनयाचा कायमचा अभ्यासक्रम तयार झाला आणि मानदंड प्रस्थापित झाला. नटाला नाटक प्रेक्षकसापेक्ष ठेवावे लागते. संहितेच्या पालखीचा भार नट वाहत असला तरी ती जबाबदारी लेखक, दिग्दर्शक आणि नट अशा तिघांचीही असते, असेही ते म्हणाले.
मुक्ता बर्वे म्हणाल्या, ‘‘ललित कला केंद्रात सतीश आळेकर यांच्यातील शिक्षकाचे वेगळे व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळाले. अनौपचारिक नाते कायम ठेवत त्यांनी त्या वेळी दिलेला मैत्रीचा हात कायम सोबत आहे. विज्ञान शाखेची पार्श्वभूमी ते ललित कला केंद्राची स्थापना हा सरांचा प्रवास थक्क करणारा आहे. सरांनी स्वत:चे अनुयायी तयार करण्याचा प्रयत्न न करता आमच्यासाठी अवघे अवकाश खुले केले. स्वत:ची शैली आमच्यावर कधीच लादली नाही. त्यामध्ये शिकण्याचा, शिकवण्याचा अभिनिवेश कधीच जाणवला नाही. त्याच्यातील अलिप्तता, समरसता, रोजच्या जगण्यातील सादरीकरण मनाला भावते.’’
अरुण खोपकर म्हणाले, ‘‘आळेकर यांची विरळ विवेकबुद्धी, कामाची पद्धत, जीवनमूल्यांचा अभ्यास आदी बाबींचा हेवा वाटतो. त्यांनी रंगभूमीवर नवरसता निर्माण केली, अत्याधुनिक तंत्राचा अभ्यास केला. धार्मिक विधीतील श्रद्धा निघून गेल्यावर कर्मकांडाचे निर्माल्य होते, हा संदेश त्यांनी ‘महानिर्वाण’ नाटकातून दिला.’’

प्रत्येक वाचनात आणि काही वर्षांनी होणाऱ्या प्रयोगामध्ये सतीश आळेकर यांची नाटके विविध आशयांसह उलगडतात. समोर आलेले जग समजावून घेऊन ते त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. घराणेपद्धती आणि अभ्यासकीय पद्धतीचा सृजनात्मक मेळ त्यांनी साधला आहे. मराठी रंगमंचावरील त्यांचा वावर अभिमानास्पद आहे.
- पुष्पा भावे

Web Title: The current situation in the society is frightening: Satish Alekar; Tanveer Honor ceremony in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे